अंथरुणाला खिळलेली ‘ती’ चालू लागली; २२ वर्षीय तरूणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:19 AM2023-05-02T10:19:13+5:302023-05-02T10:19:30+5:30
पालिका रुग्णालयात एक हजाराहून अधिक मणक्याच्या शस्त्रक्रिया
मुंबई : मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या आणि अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मीळ शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे करण्याची किमया मुंबई पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयाने स्पाइन क्लिनिकच्या मदतीने साध्य करून दाखविली आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १० दिवसांत ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे. दरम्यान, देसाई रुग्णालयातील स्पाइन क्लिनिकमध्ये २००९ पासून आजवर मणक्याच्या ३७ हजार रुग्णांवर उपचार, तर एक हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
मणक्याचे आजार हे कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत त्रासदायक आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात अडथळे आणणारे ठरतात. अशाच मणक्याच्या व्याधीने ग्रस्त एक २२ वर्षीय तरुणी गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाली. या तरुणीला चालता येत नव्हते, पायांची हालचाल होत नव्हती. महिनाभर ती अंथरुणाला खिळून होती. रुग्णालयात दाखल केल्यावर तरुणीला मणक्याचा क्षयरोग झाल्याचे तसेच त्यामुळे मणक्यातील विविध नसांवर दाब आल्याचे आढळले. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तसेच स्पाइन क्लिनिकचे रुग्णालयातील मानद वैद्यकीय सल्लागार डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद यांनी ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानंतर, या तरुणीच्या मणक्यावर डिकाॅम्प्रेशन व हार्टशील फिक्सेशन शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ही तरुणी स्वत:च्या पायावर उभी राहू शकली, तर अवघ्या दहा दिवसांत ती कमीत कमी आधार घेऊन चालू लागली. रुग्णाचे मूत्राशय व ओटीपोट पूर्ववत झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
स्थानिक भोंदूंना बळी पडू नका
पाठीचे विशेषतः मणक्याचे कोणतेही विकार, दुखणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा तातडीने सल्ला घ्यावा. स्थानिक भोंदूंकडून उपचार घेऊ नयेत, अन्यथा आजार बळावतात. त्यातून दुर्धर स्थिती होऊ शकते, असे आवाहन व्ही. एन. देसाई महापालिका रुग्णालयाने केले आहे.