Join us

राज्यातील बालविवाहांत मोठी वाढ, एनसीआरबीच्या अहवालातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:57 PM

NCRB च्या अहवालात महाराष्ट्रात बालविवाहात विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

मुंबई : राज्यातील बालविवाहात सातत्याने वाढ होत असून २०११च्या जनगणनेनुसार सुमारे ११.६ लाख मुलांचा विवाह १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच झाला होता. याशिवाय नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१९-२१च्या अहवालानुसार, मागील ३ वर्षात राज्यात बालविवाहाला बळी पडलेल्यांची संख्या ८२ वर पोहोचली. बालविवाहाला आळा घालण्यासाठी यशवंतराव चव्हाण केंद्रात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन्स फाउंडेशनतर्फे बालविवाहमुक्त भारत मोहिमेची घोषणा करण्यात आली.

 राज्यात बालविवाहात वाढबालविवाहमुक्त भारत साकारण्यासाठी चिल्ड्रन्स फाउंडेशनने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची मदत घेतली आहे. बालविवाहमुक्त भारतासाठी देशभरात काम केले जात आहे. त्यानुसार, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची नियुक्ती, बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवणे अनिवार्य करणे व अल्पवयीन मुलांचे लग्न न करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे यावर भर दिला जात आहे. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आयुक्त सुशीलाबेन शाह, सीडब्ल्यूसीचे मुंबई अध्यक्ष आर. विमला, मिलिंद बिडवई व चिल्ड्रन्स फाउंडेशनचे संचालक राकेश सेंगर उपस्थित होते.

सरकारी संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी यांनी ही प्रथा थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. याकरिता आमची संस्था बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि नागरी समाज गटांसह एकत्र काम करेल. अशी माहिती चिल्ड्रन्स फाउंडेशनचे कार्यकारी संचालक राकेश सेंगर यांनी दिली. 

 

टॅग्स :मुंबईलग्नमहाराष्ट्र