लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नित्याच्या कामात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी आणि सायबर सुरक्षेसाठी आता ईडीने एकूण ४२ संगणक अभियंत्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेत ही प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये सात सिस्टीम ॲनालिस्टची पदे, तर ३६ तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीची असून, नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस पाच वर्षांपर्यंत ईडीच्या संगणकीय प्रणालीमध्ये काम करता येणार आहे.
इंटरनेटवरून होणारे ईडीचे व्यवहार, सायबर सुरक्षा, आवश्यक ती सॉफ्टवेअर प्रणाली हाताळणे, ई-मेल सेवा व सहकार्य, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सहकार्य अशा महत्त्वाच्या कामांसाठी ही नेमणूक केली जाणार आहे. यामध्ये सिस्टीम ॲनालिस्टना महिन्याकाठी ७० हजार, तर तांत्रिक सहकार्य कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी ५५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांशी गुप्तता करार सुरुवातीला या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी होणार आहे तर हे नोकरीचे कंत्राट पाच वर्षांपर्यंतदेखील वाढविले जाऊ शकते. ईडीतील काम संवेदनशील असल्यामुळे निवड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुप्तता करारावर देखील स्वाक्षरी करावी लागणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना ईडीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये काम करावे लागणार आहे.