Join us

डॉक्टर असलात तरी स्वतःचे उपचार स्वतः करू नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 10:11 AM

डॉक्टरांच्या मृत्यूने चर्चेला उधाण.

मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातील (सायन रुग्णालय) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा (जनरल सर्जरी) विषयाच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरचा हॉस्टेलच्या खोलीत गुरुवारी मृतदेह आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रुग्णालय प्रशासनाने त्या डॉक्टरने स्वतः सलाइनमधून औषधी घेतल्याने त्याला त्याची रिॲक्शन येऊन मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींनीच नव्हे, तर डॉक्टरांनीसुद्धा स्वतःचे उपचार स्वतःवर करू नयेत ते धोकादायक असल्याचे  मत वैद्यकीयतज्ज्ञ व्यक्त करत आहे.   

त्यावेळी स्वतः उपचार करण्यापेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अनेक वैद्यकीय परिषदांमध्येसुद्धा या मुद्यांवर यापूर्वीच सविस्तर चर्चा झाली आहे. अनेक वेळा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोळ्या सामान्य आजारासाठी घेतल्या जातात. मात्र क्वचित वेळी त्यामधूनसुद्धा औषधाची रिॲक्शन येऊ शकते. सायन रुग्णालयातील निवासी डॉ. सौरभ धुमाळ याने  त्याला ताप आला म्हणून दोन दिवस सलाइनमधून अँटिबायोटिक्सची औषधी घेतली आणि त्याची त्याला रिॲक्शन येऊन मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. या घटनेमुळे  वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

१) अनेक वेळा डॉक्टर मंडळी किंवा सर्व सामान्य व्यक्तीसुद्धा अनेक वेळा आजारी पडल्यानंतर स्वयं औषधोपचार करत असतात. 

२) मात्र, अशा पद्धतीने स्वतःवर उपचार करू नये असे अनेक वेळा सांगितले जाते. ३) कारण आपण ज्यावेळी आजारी असतो त्यावेळी आपली मानसिक स्थिती चांगली नसते. 

सर्दी थंडीची साधी औषधी असतील तर मी एक वेळ समजू शकतो. मात्र, आपला आजार बळावून काही विशिष्ट औषधींची गरज असेल तर ती तज्ज्ञांकडून घ्यावीत. कारण काही नवीन औषधी असतात त्याची काय रिॲक्शन येईल ते पटकन कळत नाही. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामध्ये स्वतः औषधोपचार करून मोठ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. - डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

डॉक्टर कितीही हुशार असला तरी त्याने स्वतःवर कोणत्याही प्रकारचे उपचार करू नयेत. कारण यामध्ये डॉक्टरांचे स्वतःवर उपचार करताना काही चूक होऊ शकते. विशेष म्हणजे फॅमिली फिजिशियन यांनीसुद्धा घरातील सदस्य कुणी आजारी असतील आणि त्यांना सलाइन लावायची वेळ आली, तर ते घरच्या घरी लावू नयेत. सलाइन क्लिनिक, नर्सिंग होम किंवा रुग्णालयातच लावावे. कारण कुठल्याही औषधीची कधीही रिॲक्शन येऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. संतोष कदम, महाराष्ट्र नियोजित अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र नियोजित अध्यक्षट

टॅग्स :मुंबईसायन हॉस्पिटल