'आग लागली अन् इमारतीतच बेशुद्ध झालो'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 08:58 AM2023-10-07T08:58:10+5:302023-10-07T08:59:15+5:30
सकाळची घटना होती. आम्ही सगळे साखरझोपेत होतो. पहिल्या माळ्यावर आमचे घर आहे.
मुंबई : सकाळची घटना होती. आम्ही सगळे साखरझोपेत होतो. पहिल्या माळ्यावर आमचे घर आहे. गेल्या बारा वर्षांपासून आम्ही सहकुटुंब राहत आहोत. मात्र आगीच्या धुरामुळे मी बेशुद्ध झालो. मला रुग्णालयातच आल्यावर शुद्ध आली. माझे वडील, बहीण आणि आई कुठे आहे मला माहीत नाही. अमित आले (वय २१) हा जसे आठवेल तसे सांगत होता. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून आपले नातेवाईक कुठे आहेत याची माहिती डॉक्टर आणि नातेवाइकांकडून घेत आहे. मात्र या दुर्घटनेतील मृतांच्या यादीत आई विष्णुमाया हिचे नाव आहे, हे संध्याकाळपर्यंत अमितला माहीत नव्हते.
अमितचे बाबा थमानसिंग आले, बहीण सीमा सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबी ट्रॉमा रुग्णालयात उपचार घेत असून त्या दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आईचा मृत्यू झाल्याची माहिती अमितला समजली नसल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते.
या दुर्घटनेची माहिती समजताच आले कुटुंबीयांच्या अनेक नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. ते सर्व रुग्णांची विचारपूस करून त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत होते.
'श्वास घ्यायला त्रास होतोय'
१ .आम्ही मूळचे नेपाळचे. माझे बाबा प्रथम या ठिकाणी आले. आमचा जन्म मुंबईचा, बाबा इलेक्ट्रिशियनचे काम करतात. आई गृहिणी आहे.
२. आम्हा बहीण-भावाचे शिक्षण मुंबई शहरातीलच आहे. कोण कुठे उपचार घेत आहे याची मला माहिती नाही. माझी तब्येत आता ठीक आहे.
३. फक्त थोड्या-फार प्रमाणात श्वास घ्यायला त्रास होत आहे. माझे नातेवाईक सुखरूप असतील, अशी मला आशा आहे, अशी अपेक्षा अमितने व्यक्त केली.