मुंबई - राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी महात्मा फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान होतं. या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली. त्यात, पुण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेनेनं राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीवर ३०७ चा गुन्हाही दाखल करण्यात आला. तर, अनेकांनी शाईफेकीच्या घटनेचा विरोधही केला आहे. मात्र, राजरत्न आंबेडकर यांनी शाईफेक करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाच केली.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानांतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक शब्दांत टीका केली होती. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा भाऊराव पाटील असतील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. मात्र, त्यांनी हेडगेवार किंवा गोळवलकरांचे नाव घेतलं नाही. याचा अर्थ हेडगेवार आणि गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले नाहीत, तर आजच्या भाषेत खोक्यांच्या स्वरुपात पैसे घेतले आणि स्वत:च्या संस्था उभ्या केल्यात. ही कबुली चंद्रकांत पाटलांनी दिल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला होता. त्यानतंर, शाईफेकीच्या घटनेचं आता राजरत्न आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राजरत्न यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचं समर्थन केलं. तसेच, पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाला माझ्याकडून वैयक्तिक १ लाख रुपये देण्याची घोषणा करतो, असेही राजरत्न आंबडेकर यांनी जाहीर केले. राजरत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ – आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत. तर, मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू आहेत. तसेच, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (BSI) अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे विचार भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.