Join us  

मोबाइल, टीव्ही आणि गॅजेटची हजार कोटींची दणदणीत उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 7:25 AM

इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये मोबाइल व टॅब्लेट प्रमाणेच स्मार्ट टीव्ही घेण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी व अन्य भेटवस्तूंप्रमाणे इलेक्ट्रॉनिक बाजारातही धूम असून गेल्या १० दिवसांत मुंबई व परिसरात अंदाजे एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या खरेदीमध्ये ग्राहकांचा सर्वाधिक भर हा मोबाइल फोन, टॅब्लेट या गॅजेटवर हाेता.

इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये मोबाइल व टॅब्लेट प्रमाणेच स्मार्ट टीव्ही घेण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. मायक्रोवेव्ह, मिक्सर-फूड प्रोसेसर, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, फ्रीज आदींना मोठी मागणी आहे. मुंबईतील ब्रँडेड दुकाने व मनीष मार्केट, अल्फा मार्केट, हिरा पन्ना मार्केट तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे किरकोळ विक्रेते यांच्याकडून अंदाजे एक हजार कोटींच्या घरात खरेदी झाल्याचे मानले जात आहे. 

१४ कोटी लोकांचे ऑनलाइन शॉपिंग ई-कॉमर्स वेबसाइटवरून होणाऱ्या खरेदीच्या ट्रेंडचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यंदा दसऱ्यापासून किमान १४ कोटी लोकांनी आपापल्या वस्तूंची खरेदी ऑनलाइन पद्धतीने केल्याचे दिसून आले. 

दसरा व दिवाळीच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांतर्फे सूट योजना घोषित करण्यात येते. तसेच, अलीकडच्या काळात वित्तीय संस्थांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांशी करार केल्याने या वस्तूंसाठी सुलभरीत्या अर्थसाहाय्यही ग्राहकांना प्राप्त होते. याचसोबत अनेक क्रेडिट कार्ड कंपन्यांनीही कार्डाद्वारे खरेदी करण्याचे प्रमाण वाढीस लागावे म्हणून ५ ते ८ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक योजना सुरू केली आहे व कार्डावरून पैसे देताना मासिक हप्त्याची सुविधाही दिली आहे. खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आलेल्या या सुलभतेमुळे ग्राहकांतर्फे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.  - वीरेन शाह, व्यापारी

टॅग्स :वीजदिवाळी 2023