Join us

पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू होता हजारो कोटींचा घोटाळा! साडेतीन वर्षांनी नोंदविला गुन्हा

By मनीषा म्हात्रे | Updated: February 7, 2025 05:31 IST

IX Global LLC, IX Global Academy Pvt Ltd: फसवणूक झालेले २१२ गुंतवणूकदार एकत्र येत ३० ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हे शाखेत गेले, तेव्हा गुन्हा नोंदवून घेतला गेला. दरम्यानच्या काळात घोटाळ्याचे सूत्रधार परदेशात पसार झाल्याची माहिती आहे. 

-मनीषा म्हात्रे

टोरेस घोटाळ्यानंतर पडद्याआड दबलेल्या अनेक घोटाळ्यांना आवाज फुटण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आयएक्स ग्लोबल घोटाळ्याची व्याप्तीही हजारो कोटीमध्ये असल्याचा अंदाज वर्तवत मुंबईसह राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेली साडे तीन वर्ष पोलिसांच्या डोळ्यादेखत हा घोटाळा सुरु होता. पोलीस मात्र गुन्ह्यांचा रक्कमेच्या चौकटीत अडकल्याने आर्थिक गुन्हे शाखेला (इओडब्ल्यू) गुन्हा नोंदवायला साडे तीन वर्ष लागले. याचाच फायदा घेत आरोपी देशाबाहेर पसार झाल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होत आहे. नागपूर, मुंबई, अहमदाबाद पाठोपाठ ठाणे, पुण्यात गुन्हे दाखल होण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत.आयएक्स ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून कंपनीमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर मार्केट, क्रिप्टो मार्केटमध्ये गुंतवणूक करत विविध मार्गाने ५ ते २५ टक्के नफा देण्याच्या नावावर हजारो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  मूळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या कल्पना तायडे यांच्या जबाबवरून गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात इओडब्ल्यूने  गुन्हा नोंदविण्यात आला. आय.एक्स. ग्लोबल एल.एल.सी. आय.एक्स. ग्लोबल अॅकॅडमी प्रा.लि., टी.पी. ग्लोबल एफ.एक्स., पोचेन ग्लोबल या कंपन्यासह कंपन्याचे संचालक जोसेफ मार्टीन, विराज पाटील,सेविवो परेरा, रमेश चौधरी, हर्ष बंसल, नयना भाटी, मंगेश शिंदेसह २५ जण आणि अन्य दलालांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीचा ओघ सुरु असून या घोटाळ्याची व्याप्ती देशभरात १० ते १५  हजार कोटींपर्यंत असल्याचा दावा गुंतवणूकदार करत आहे.

२०२१ मध्येच याप्रकरणी तक्रारदाराने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत घोटाळ्याला वाचा फोडली. ताडदेवकडून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवले. मात्र अवघी ३६ हजाराची तक्रार असल्याने पुढील तपास करण्याऐवजी आर्थिक गुन्हे शाखेने हा अर्ज ताडदेव पोलिसांना वर्ग करत, तक्रारदाराला तपासासाठी १० कोटींपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार आणण्यास सांगितले. एकीकडे तक्रारदाराकडून गुंतवणूकदारांचा पाठपुरावा सुरु असताना दुसरीकडे आयएक्स ग्लोबल विविध स्कीम आणून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत होती. अखेर, गेल्यावर्षी ३० ऑगस्ट रोजी २१२ गुंतवणूकदारांच्या एकत्रित तक्रार अर्जावरून आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला. मात्र गुन्हा नोंदविल्यानंतर घोटाळा उघडकीस आणणाऱ्याचा जबाब अद्याप झालेला नाही. शिवाय, टोरेस प्रकारानंतर गुंतवणूकदाराना कॉल, मेलद्वारे बोलाविण्याची लगबग वाढल्याचाही आरोप आहे.

घरच्या पत्त्यावर कंपनी  १३ जानेवारी २०२० मध्ये विराजने दहिसर येथील राहत्या घराच्या पत्त्यावर ही कंपनी नोंद आहे. त्याचप्रमाणे ही कंपनी अमेरिकेतील उटा येथे त्यांचे कार्यालय प्रकरणी असल्याचा  दावा केला होता.  

५०० जणांचे जबाब नोंदवले..तपास अधिकारी राहुल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएक्स ग्लोबलमध्ये आतापर्यंत ५०० गुंतवणूकदरांचे जबाब नोंद झाले असून फसवणुकीचा आकडा ६९ कोटींवर पोहचला आहे. सुरुवातीला ३६ हजाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण स्थानिक पोलिसांना वर्ग केले. पुढे फसवणुकीचा आकडा साडे सहा कोटींवर जाताच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ईडीने विराज पाटील आणि प्रसंजीत दासवर अटकेची कारवाई केल्यानंतर दोघांचा ताबा घेत आयएक्स ग्लोबलच्या गुन्ह्यात अटक दाखवण्यात आली आहे. तक्रारदारांचे जबाब नोंदविणे सुरु असून, लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगितले.

तिघांविरुद्ध एलओसी...सॅविवो पेरेरा, मंगेश शिंदे, जोसेफ मार्टिन विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने एलओसी जारी केली आहे.  मार्टिन विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस देखील जारी करण्यात येणार आहे. इओडब्ल्यूच्या विरोधामुळे आरोपी नयना भाटी आणि अजित डोके यांचा अटक पूर्व जामीनही फेटाळल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले.

परदेशी ब्रोकर अन हवालाचा आधार ...आयएक्स ग्लोबलमध्ये आरोपी परदेशी ब्रोकरकडे खाते उघडून रक्कम वैयक्तिक खात्यात किंवा हवाला मार्फत ब्रोकरकडे असलेल्या खात्यात बेकायदेशीरपण पैसे जमा करतात. त्याच प्रमाणे महिन्याला ५ ते २५ टक्के नफा देण्याबाबत, भारतात कायदेशीर नसलेल्या आय. एक्स. ग्लोबलच्या वॉलेटमध्ये बेकायदेशीरपणे पैसे घेतात. आजही आजही विविध स्कीम सुरु असल्याचा दावाही गुंतवणूकदार करत आहे.        नोव्हेंबर पासून पैसे येणे बंद...सुरुवातीला चार महिने व्यवहार सुरळीत चालू होते.  नोव्हेंबर २०२२ पासून कंपनीतून पैसे काढण्यास टाळाटाळ सुरू झाली. काही दिवसांनी टि.पी. ग्लोबल एफएक्स आणि आयएक्स ग्लोबलची वेबसाईट बंद झाल्या.  चौकशीत कपंनीच्या प्रमुख काही सदस्यावर कायदेशीर कारवाई झाल्याने गुंतवणूकदारानी आपली सर्व रक्कम एफएक्स ऑप्युलन्सच्या वेबसाईटवर जावून ट्रान्सफर करण्यास सांगितली. पुढे, द डेटबॉक्स, क्रिप्टोलँड सह विविध स्किममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितल्याचे नमूद केले आहे. तसेच कंपनीविरुद्ध खोट्या तक्रारी होत असल्याने नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन करत कपंनीतर्फे आजही मुंबईत सेमिनार आयोजित करत असल्याचा आरोप तक्रारदार कल्पना तायडे यांच्या जबाबातून समोर येत आहे. 

अशी करायचे फसवणूक..तायडे यांच्या तक्रारीनुसार, आय. एक्स. ग्लोबल मध्ये पैसे कमवण्यासाठी त्यांनी, बायनरी, फोरेक्स, स्पोर्ट क्रिप्टो मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग, कशी करायची खरेदी किंवा विक्री करून पैसे कमवायचे याबाबत टिप्स देणे सुरू केले. दर महिन्याला १२४.९९ अमेरिकन डॉलर बेसिक प्लान व १४४.९९ अमेरिकन डॉलर प्रो प्लान इतकी रक्कम आकारतात. ऑटोमेशन ट्रेडिंगमध्ये १०० अमेरिकन डॉलर पेक्षा अधिक पैसे घेऊन महिन्याला ५ ते १५ टक्के किंवा ८ ते ९ महिन्यात दुप्पट पैशांचे आमिष दाखवायचे.

डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग प्लान -  यात, कुठल्याही सदस्याने सुरुवातीला ३ नवीन सदस्यांना आय. एक्स. ग्लोबल मध्ये प्रवेश करून दिला. तर त्याला जवळपास ११ वेगवेगळ्या लेव्हल नुसार १०० अमेरिकन डॉलर ते १ लाख अमेरिकन डॉलर पेक्षाही जास्त रक्कम प्रती महिना कमवता येण्याचे आश्वासन दिले जात होते. यासाठीही त्यांच्या परदेशात असलेल्या टीपी ग्लोबल एफएक्स नावाच्या इंटरनॅशनल फॉरेक्स ब्रोकरकडेचदिलेल्या लिंक वर जाऊन खाते उघडून त्यांच्या खात्यात आय. एक्स. ग्लोबलच्या मदतीनी पैसे जमा करूनच ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑटोमेशन ट्रेडिंग करता येणार असल्याचे सांगितले.

विराज पाटील म्हणे, तुषार पटेल सूत्रधारईडीने विराज पाटील आणि प्रसंजित दासला अटक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेत चौकशी केली. तेव्हा, पाटीलने यामागील मुख्य सूत्रधार तुषार पटेल असल्याचे सांगितले. दहावी पास असलेला पटेल हा दुबईत राहतो. तो शेअर मार्केट गुंतवणुकीचे काम करत असल्याचे समजते.  येथील गुंतवणूकदारांचा पैसा त्याच्याकडे गेल्याचा दावा पाटीलने केला आहे. त्यामुळे पटेलच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असून त्याच्या, चौकशीतून तपासाला आणखीन मदत होईल असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ते बँक खातीही आम्हीही गोठवली...ईडीने केलेल्या कारवाईत २६० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली. यामध्ये १२० कोटी बँक खात्यात तर १४० कोटीच्या मालमत्ताचा समावेश आहे. या मालमत्ता आणि बँक खाती ईओडबल्यूने देखील गोठवल्याचे दाखवले आहे. तसेच लवकरच आरोपपत्र दाखल करत या मालमत्तासाठी सीबीआय कोर्टात देखील अर्ज करणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :धोकेबाजीक्रिप्टोकरन्सीमुंबई पोलीसगुन्हेगारी