मुंबई : अनंत चतुर्दशीला शहरात कडेकोट बंदोबस्त असताना "मंगेश नावाचा मच्छीमार हा दहशतवादी असून पाकिस्तानमधून आल्याचा कॉलने खळबळ उडाली. चौकशीत स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त महिलेने खोटी माहिती देणारा कॉल केल्याचे समोर आले. या महिलेने २०२२ पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ११० वेळा कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका महिलेने कॉल केला होता. मंगेश मच्छीमार हा दहशतवादी असून तो पाकिस्तानातून आला आहे. त्यानंतर तिने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्ध नगर येथील पत्ता सांगितला. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथकासह स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. चौकशीत दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेने २०२२ पासून ११० वेळा नियंत्रण कक्षाला कॉल केल्याचे निष्पन्न झाले. महिला स्किझोफ्रेनिया ग्रस्त असून या आजारावर घाटकोपर येथील डॉक्टरकडे उपचार घेत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना मिळाली. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन असे परिणाम जाणवतात. अशा अवस्थेत व्यक्तीला भास झाल्यामुळे तो तेच सत्य मानून कृती करतो. त्यातूनच ही महिला असे कॉल करत असल्याचे समोर येत आहे.