Join us  

विशेष मुलांना ‘स्वावलंबी’ बनविणारी शाळा; आरती देव स्वानुभवातून देत आहेत धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 12:44 PM

अंधेरीतील ‘ॲकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेद्वारे त्या स्वावलंबनाचे धडे देत आहेत.

मुंबई : आपल्याला आलेल्या अनुभवातून स्वत: शिकत इतरांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या आरती देव यांनी विशेष मुलांना प्रशिक्षित करण्याचा वसा घेतला आहे. अंधेरीतील ‘ॲकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या विशेष मुलांसाठी असलेल्या शाळेद्वारे त्या स्वावलंबनाचे धडे देत आहेत.दिवंगत अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांच्या सूनबाई तसेच अजिंक्य देव यांची पत्नी आरती यांनी विशेष मुलांसाठी मोलाचे कार्य करत आपली नवी ओळख निर्माण केली. सुशीलाबाई नानासाहेब देव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून २०१२मध्ये ही शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, डाउन सिंड्रोम, कोणत्याही प्रकारचा मेंदूचा आजार, तसेच कोणतेही अनुवांशिक विकार असलेल्या मुलांना शिकवले जाते. मुलगी तनयावर उपचार करत असताना इतरही मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रशिक्षित करण्याचा वसा आरती यांनी घेतला. 

याबाबत आरती देव म्हणाल्या, २०१२ मध्ये जेव्हा शाळा सुरू केली, तेव्हा मी तनयासोबत घरी डॅा. लेन डोमिन यांचा डोमेन डेलॅकॅटो प्रोग्रॅम करत होते. त्यापूर्वी अजिंक्य आणि मी अमेरिकेला जाऊन लेक्चर्स अटेंड केली होती. जवळपास सहा वर्षे तो प्रोग्रॅम मी घरी केला. 

सहा महिन्यांनी अमेरिकेला जायचो. या प्रोग्रॅममध्ये डाएटपासून दिवसभराच्या दिनचर्येचा समावेश असतो. ते सुरू केल्यापासून तनयामध्ये खूप फरक दिसल्याने तो सुरू ठेवला. हा प्रोग्रॅम आपल्याकडच्या पालकांना का माहीत नाही? हा प्रश्न मला पडला. या प्रोग्रॅमसाठी जागा आणि माणसांसोबतच पैसेही लागत असल्याने सर्वांना शक्य होणारे नसल्याचे जाणवल्याने एखादे सेंटर किंवा शाळा सुरू करण्याचा विचार आला. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याने बीएमसीच्या वेल्फेअर सेंटरमध्ये लीजवर जागा मिळाली आणि शाळा सुरू झाली.

देश-विदेशांतील मुलांना फायदामेक्सिको, ब्राझील, झेकोस्लोव्हाकिया, रशिया, अमेरिका अशा विविध देशांतील जवळपास ३० पेक्षा अधिक मुलांना आरती यांनी ट्रेनिंग दिले आहे. १०:३० ते ४:३० या वेळेत भरणाऱ्या शाळेत १३० मुले आणि चार शिक्षक आहेत.

शाळेत हे शिकवितात...सध्या शाळेत बीमर व्हॅस्क्युलर थेरेपी, इंटिग्रेटेड लिस्निंग सिस्टीम, फंक्शनल ॲकॅडमिक्स, अनाट बेनियल मेथड न्यूरो मूव्हमेंटसारख्या प्रोग्रॅम्ससोबत स्वत:ची काळजी स्वत: घेत दिनचर्या शिकवून त्यांना स्वावलंबी बनवले जाते. पेट थेरेपीद्वारे मुलांच्या मनातील भीती दूर केली जाते. 

सेलिब्रिटींचा पाठिंबा...अभिनेते अनुपम खेर यांनी शाळेला आर्थिक मदत दिली आहे. पहिल्या वर्षी प्रोग्रॅमला अनिल कपूर आले होते. सोनाली कुलकर्णी, निवेदिता सराफ, निशिगंधा वाड, सुकन्या कुलकर्णी आदी बऱ्याच सेलिब्रिटींचा पाठिंबा आहे. 

टॅग्स :शाळाविद्यार्थी