Join us

टाटा एआयजीचा वरिष्ठ व्यवस्थापकच निघाला ठग; मेहुणा-मेहुणीला वेंडर्स बनवून लाटले साडेआठ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:02 AM

टाटा एआयजी, जनरल इन्शुरन्स कंपनीचे उपाध्यक्ष कपिल शहा (४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

मुंबई : मेहुणा-मेहुणीला वेंडर्स बनवून कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकानेच साडेआठ कोटी लाटल्याचा धक्कादायक प्रकार टाटा एआयजी, जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबईत शाखेत झाला आहे. या प्रकरणी एन.एन. जोशी मार्ग पोलिसांनी गुरुवारी कर्मचाऱ्यासह एकूण १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.  टाटा एआयजी, जनरल इन्शुरन्स कंपनीचे उपाध्यक्ष कपिल शहा (४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

दिल्लीरहिवासी असलेल्या ब्रिजेंद्र अवधेश सिंग (४३) या कर्मचाऱ्याने हा गंडा घातला. ब्रिजेंद्र हा २००८ पासून नवी दिल्लीत व नंतर मुंबईत कार्यरत होता. १ नोव्हेंबर, २०१६ पासून मुंबईच्या कार्यालयात वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर होता. येणाऱ्या वेंडर्सचे कागदपत्रे, केवायसी तपासून ॲग्रीमेंट करण्यासाठी ऑथोराइस सिग्नेटरीकडे पाठविणे, इनव्हाइस तपासणी व पेमेंट प्रोसेससाठी अप्रूव्हल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने २०२० मध्ये अचानक मित्रांना वडिलांचा मोठा व्यवसाय असून, त्याचे वडील हे वयोवृद्ध असल्याने, त्यांनी कंपनीतील पदाचा राजीनामा देण्याचा विचार केल्याचे सांगितले. 

बिजेंद्रच्या राजीनाम्यानंतर काही वेंडर्सनी कंपनीस सेवा पुरविण्याचे बंद केल्याने संशय निर्माण झाला. यांच्यात काहीतरी पैशांचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट होताच, पथकाने केलेल्या चौकशीत ११ वेंडर्सची नावे मिळाली. ते वेंडर्स हे त्याचे मित्र, नातेवाईक असल्याचे समजताच, त्यांना धक्का बसला. बिजेंद्रने नातेवाइकाची कागदपत्रे कंपनीत सादर करून ते अधिकृत वेंडर्स दर्शवून त्यांच्या बनावट वेंडर्सच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करून घेतले. 

मित्र करायचा सह्या...ब्रिजेंद्र कंपनीच्या ईमेलवरून त्याचा दिल्लीतील मित्र धीरज कुमार गगनदेव सिंग याला मेल करायचा. धीरज कुमार त्या ११ वेंडर्सचे इनव्हाइस प्रिंट करून, त्यावर सही करून ब्रिजेंद्रकडे पाठवायचा. तो कंपनीकडे पाठवून पेमेंट करून घेत असल्याचे समोर आले. हे इनव्हाइसेस हे जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२० च्या दरम्यानचे असल्याचे स्पष्ट झाले. 

पत्नी, वडील आणि मित्राच्या खात्यात पैसेहे पैसे पत्नी, वडील आणि मित्राच्या खात्यात वळते करण्यात आल्याची कबुली ब्रिजेंद्रने दिली आहे. मेहुणा, मेहुणी वेंडर्स असल्याचे दाखविले.  जवळपास साडेआठ कोटींच्या रकमेवर त्याने डल्ला मारला आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजीपोलिस