तृतीयपंथींसाठी राज्यात प्रथमच स्वतंत्र वॉर्ड; जी. टी. रुग्णालयात नववर्षापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:31 AM2022-10-30T06:31:11+5:302022-10-30T06:31:36+5:30

जी. टी. रुग्णालयात नववर्षापासून सुरुवात; राज्य शासनाचे मोठे पाऊल

A separate ward for the first time in the state for third parties; G. T. Starting with the new year at the hospital | तृतीयपंथींसाठी राज्यात प्रथमच स्वतंत्र वॉर्ड; जी. टी. रुग्णालयात नववर्षापासून सुरुवात

तृतीयपंथींसाठी राज्यात प्रथमच स्वतंत्र वॉर्ड; जी. टी. रुग्णालयात नववर्षापासून सुरुवात

googlenewsNext

- संतोष आंधळे

मुंबई  : समाजातील वंचित घटक समजल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी  राज्यात प्रथमच शासनाच्या जी. टी. रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड केला जाणार आहे. या वॉर्डमध्ये केवळ तृतीयपंथींवरच उपचार केले जाणार आहेत. या रुग्णांना कशा पद्धतीने उपचार दिले जावेत यासाठी  विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. नवीन वर्षाच्या सुुरुवातीला हा वॉर्ड तृतीयपंथी रुग्णांसाठी खुला केला जाणार आहे. 

सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या अखत्यारित येणाऱ्या जी. टी. रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १३, दुसरा मजला, हा या रुग्णांसाठी  उपलब्ध करून दिला जाणार आहे. ३० बेड्सची व्यवस्था सध्या करण्यात आली असून भविष्यात ४५ बेड्स करण्यात येणार आहे. या वॉर्डला संलग्न अशी स्वतंत्र प्रसाधनगृहे तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विशेष ओपीडी करण्यात येणार असून तपासणी आणि उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. इतर रुग्णांना ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या सर्व सेवा या रुग्णांना दिल्या जाणार आहेत. तसेच या वॉर्डमध्ये रुग्ण दाखल करून घेताना त्यांच्या विशेष तपासण्या आणि चाचण्या करून घेण्यात येणार आहेत.  

विशेष काय?

  • उपचार घेण्यासाठी तृतीयपंथी असल्याचे ओळखपत्र आवश्यक.
  • स्वयंसेवी संस्थेने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरणार.
  • ओळखपत्र नसल्यास तृतीयपंथीने स्वघोषित पत्र देणे अपेक्षित. 
  • या विशेष सुविधांचा कुणी गैरफायदा घेत नाही, याची दक्षता घेतली जाईल. 
  • मिळणार प्रतिसाद पाहून राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयात असा वॉर्ड सुरू करणार. 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हा स्वतंत्र वॉर्ड तयार केला जात आहे. हा वॉर्ड तयार करताना या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफ आणि सहायकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. वेगळा केस पेपर तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी तृतीयपंथी हा निवडीसाठी पर्याय दिला जाणार आहे. वॉर्ड तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाईल.

- डॉ. पल्लवी सापळे,  अधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय 

ही मागणी आम्ही शासनाकडे करत होतो. अनेकदा सार्वजनिक रुग्णालयात उपचारार्थ तृतीयपंथींना चांगली वागणूक मिळत नाही. कोणत्या वॉर्डात दाखल करायचे यावरून वाद निर्माण व्हायचे. कुठल्या प्रसाधनगृहाचा वापर करायचा हा कळीचा मुद्दा असायचा. 
- दिशा पिंकी शेख, सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: A separate ward for the first time in the state for third parties; G. T. Starting with the new year at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.