मुंबईत धक्कादायक घटना! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 10:16 AM2023-11-20T10:16:58+5:302023-11-20T11:06:21+5:30
कुर्ल्यातील शांतीनगर येथे एक संशयित सुटकेस आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडलेल्या महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याची माहिती आहे. मात्र सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुर्ल्यातील शांतीनगर येथील मेट्रो साइटवर स्थानिकांना दुपारच्या सुमारास एक संशयित सुटकेस आढळली. त्यानंतर याबाबतची माहिती कुर्ला पोलिसांना देण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुटकेसची पाहणी केली असता त्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला.
खुनाचा संशय
महिलेचा मृतदेह ज्या सुटकेसमध्ये आढळला ती सुटकेस दुमडलेल्या अवस्थेत मेट्रोच्या बॅरिकेट्समध्ये टाकण्यात आली होती. मृत महिलेने टी शर्ट आणि नाइट पँट परिधान केलेली होती. वादानंतर सदर महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र ही महिला नेमकी कुठली आहे, तिचा खून का करण्यात आला, याबातची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, मुंबईसारख्या शहरात भर दुपारी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून महिलेची ओळख पटवत तिच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.