Mumbai Rains : परतीच्या पावसाने मुंबई आणि उपनगरे अक्षरशः झोडपून काढली आहे. गेल्या काही तासांत झालेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाट शोधणंही लोकांना कठीण गेले. याच दरम्यान, अंधेरी एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मॅनहोलचे झाकण काढण्यात आलेले होते. तुंबलेल्या पाण्यामुळे त्याचा अंदाज आला नाही आणि महिला त्यात पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या सीप्झ मेट्रो स्टेशन परिसरात ही घटना घडली सीप्झजवळ मेट्रो लाईन ३ चे काम काम सुरू आहे. तिथे एका मॅनहोलचे झाकण काढण्यात आले होते.
काम संपवून महिला निघाली होती घरी
विमल गायकवाड (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री (२५ सप्टेंबर) विमल गायकवाड या काम संपवून घरी निघाल्या होत्या. रात्री नऊ-साडेनऊच्या दरम्यान, त्या सीप्झ कंपनीच्या परिसरात पोहोचल्या. रस्ता ओलांडत असताना त्यांना मॅनहोल असल्याचे लक्षात आले नाही. पाऊल टाकताच त्या खाली पडल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी विमल गायकवाड यांचा शोध सुरू केला. ज्या मॅनहोलमध्ये विमल गायकवाड पडल्यात होत्या, तिथून पुढे १०० मीटरवर गेल्यानंतर तिसऱ्या मॅनहोलमधून त्यांना बाहेर काढण्यात आले.
विमल गायकवाड यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मेट्रो ३ लाईनचे काम सुरू असून कामासाी मॅनहोलचे झाकण काढण्यात आले होते अशी माहिती आहे. झाकण पुन्हा लावण्यात आले असते, तर महिलेचा जीव वाचला असता.