मुंबई - राज्यातील मराठा लष्करी किल्ल्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने या स्मारकांचे युनेस्को जागतिक वारसा दर्जासाठी नामांकन व्हावे असा शासनाचा मानस आहे. यामुळे विदेशी पर्यटक आकर्षित होऊन राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असून त्या अनुषंगाने रोजगारनिर्मितीही होणार आहे. यासाठी आता राज्यातील किल्ल्यांचे स्थळ व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने राज्यातील या किल्ल्यांचे युनेस्को जागतिक वारसा नामांकनाकरिता प्रस्ताव तयार करण्यासाठी तज्ञ वास्तुविशारद द्रोनाह संस्थेकडे काम दिले आहे. या प्रक्रियेतील स्थळ व्यवस्थापन आराखड्यासाठी सुरुवातील १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, त्यासाठी नुकतीच या निधीला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय अंतर्गत या प्रकल्पाचे काम राज्यात गतीने सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोला नामांकन पाठवले आहे. युनेस्कोच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील साल्होर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेली किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्गातील किल्ला आणि तामिळनाडूतील गिंगी किल्ला यांचा समावेश आहे.