अंधेरी उड्डाणपुलाखाली खासगी बांधकामाचा स्लॅब कोसळला
By जयंत होवाळ | Published: July 4, 2024 07:48 PM2024-07-04T19:48:24+5:302024-07-04T19:50:19+5:30
गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या येथील अंधेरी उड्डाणपुलाखालील एका खासगी व्यावसायिक बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला.
मुंबई: गुंदवली मेट्रो रेल्वे स्थानकाच्या येथील अंधेरी उड्डाणपुलाखालील एका खासगी व्यावसायिक बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. स्लॅबचा काही भाग खाली असणाऱ्या कारच्या टपावर पडला. ही घटना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अंधेरी पूल हा आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत होता. त्यानंतर तो एमएमआरडीएकडे देण्यात आला.
अनेक वर्षे एमएमआरडीए पुलाची देखभाल करत होते. त्यानंतर २०२२ साली एमएमआरडीएच्या अखत्यारीतील सर्व पुलांची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून सर्व पुलांची देखभाल पालिका करत आहे. या पुलाच्या खालील भागात एका खाजगी कंपनीचे बांधकाम सुरु होते. या बांधकामाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. याबाबत पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे.