Join us

रोहित पवारांची आव्हाडांना चपराक?; राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 11:56 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराला आज सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार गटातीह दोन गट आहेत की काय, असा प्रश्न चर्चेत आहे. कारण, आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेत कुठेही प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचा सहभाग दिसून आला नाही. तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनीही या यात्रेकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. युवा संघर्ष यात्रेनंतर काही काळ माध्यमांपासून दूर असलेले आमदार रोहित पवार पुन्हा सक्रीय झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला ते गैरहजर होते, त्यावर त्यांनी खुलासाही केला आहे. मात्र, रात्री उशिरा ट्विट करुन त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यावर हल्लाबोल केल्याची चर्चा रंगली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराला आज सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर होत असलेल्या या शिबिराला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र, या शिबिरात राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने तर्क-वितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहीत खुलासा केला आहे. त्यानंतर, रात्री उशिरा त्यांनी पोस्ट करत आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या ट्विटवर काही कमेंटही त्याच अनुषंगाने आल्या आहेत.

देशभरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून गावागावात हा सोहळा आयोजित केला जात आहे. पंतप्रधान मोदींनीही या दिवशी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशावासीयांना केलं आहे. त्यामुळे, प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा सध्या राजकीय मुद्दा बनला आहे. भाजपासह विरोधकही राम सांगत आहेत. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन ट्विट केल्याचा अनेकांचा अंदाज आहे. आज नको त्या विषयावर बोलून राज्यातील वाद वाढवून घेण्यापेक्षा, ज्वलंत विषयावर सरकारला धारेवर धरण्याची गरज असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.

''आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे,'' अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाचा टोला लगावल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. 

रोहित पवार यांच्या ट्विटर काही कमेंट त्याच अनुषंगाने आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, याबाबत रोहित पवार खुलासा करतील, तेव्हाच त्यांच्या या ट्विटचा अर्थ स्पष्ट होईल. मात्र, प्राथमिक दर्शनी हे ट्विट जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून असल्याची चर्चा सोशल मीडियातून होत आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असे म्हणत आव्हाड यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वाद निर्माण केला आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, आव्हाड व्यासपीठावरुन बोलत होते. ''आपण हा इतिहास तुम्ही वाचत नाही. राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करुन खाणारा राम तो आमचा आहे, बहुजनांचा. तुम्ही तिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात. पण, त्या रामाचा आम्ही आदर्श पाळतो आणि मटन खातो आहोत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. राम हा शाकाहारी नव्हताच, तो मांसाहारी होता. १४ वर्षे जंगलात जाणारा माणूस कुठे जाणार शाकाहारी अन्न शोधायला, मी जे बोलतो ते खरंच बोलत असतो'', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे.  

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसजितेंद्र आव्हाडराजकारण