म्हाडाच्या बिल्डिंगपेक्षा झोपडपटटी बरी; रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला
By सचिन लुंगसे | Published: January 3, 2024 03:52 PM2024-01-03T15:52:59+5:302024-01-03T15:53:16+5:30
कोकण मंडळाच्या विजेत्या अर्जदारांच्या शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना यांना पत्र लिहले आहे
मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीतील विजेत्या अर्जदारांना शिरढोण येथील घरांचा ताबा मिळाला असला तरी आजही रहिवाशांचे पिण्याच्या पाण्याविना हाल सुरु आहेत. शिवाय इमारतीसह लगतच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला असून, म्हाडासह नियुक्त केलेल्या बिल्डराला समस्यांची जाणीव करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
कोकण मंडळाच्या विजेत्या अर्जदारांच्या शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना यांना पत्र लिहले आहे. या पत्रात रहिवाशांनी व्यथा मांडल्या आहेत. कोकण मंडळाकडून शिरढोणमधील घरांची लॉटरी २०१८ साली काढण्यात आली. अत्यल्प उत्पन्न गटातील हा प्रकल्प असून, येथील रहिवासीही आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील आहेत. या प्रकल्पातील १५ इमारतींचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर २०२२ साली पत्र मिळाल्यानंतर २०२३ साली घरांचा ताबा मिळाला. म्हाडाने प्रतिसदनिका वार्षिक देखभाल खर्च १९ हजार २०० ठरवला आहे. मात्र ही रक्कम अवाजवी आहे. शिवाय रक्कमेच्या तुलनेत देण्यात येणा-या सुविधा तोकड्या आहेत.
पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नाही.
- रीफील बाटले (सील पॅक नसलेले) पाणी दिले जाते.
- प्रकल्पास १८ मीटर रुंद रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पुर्ण झालेले नाही.
- इमारतीमध्ये पॅसेजची स्वच्छता केली जात नाही. यासाठी बिल्डरच्या प्रतिनिधींना विनंती करावी लागते.
- प्रति इमारत २ कच-याचे डबे पुरविणे आवश्यक आहे.
- इमारत परिसरात राडारोडा आहे.
- घोणस प्रजातीच्या सांपाचा परिसरात वावर आहे.
- लिफ्टची दुरावस्था झाली आहे.
- सुरक्षा रक्षक नावापुरते आहेत.
- बिल्डरांच्या कर्मचा-यांना वापरण्यासाठी उघड्यावर मुता-यांचे बॉक्स आहेत. मात्र येथील दुर्गंधीचा मोठा त्रास होतो आहे.
- अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ६ महिन्यांपूर्वी विनंती करूनही डांबरीकरण झालेले नाही.
- खडी टाकलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
मागणी
शिरढोणमधील विजेत्यांना पुढील ५ वर्षांचे सेवाशुल्क माफ करण्यात यावे.
कोण विचार करणार
म्हाडा आणि नियुक्त बिल्डरांना या समस्येची वारंवार जाणीव करून देण्यात आली. मात्र कोणीही याचा गांर्भीयाने विचार करत नाही.