डॉक्टरांच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले हसते-खेळते कुटुंब

By मनीषा म्हात्रे | Published: August 4, 2022 09:37 AM2022-08-04T09:37:16+5:302022-08-04T09:37:35+5:30

सहा वर्षांनी राजावाडी रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा

A smiling family is ruined by a doctor's mistake | डॉक्टरांच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले हसते-खेळते कुटुंब

डॉक्टरांच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले हसते-खेळते कुटुंब

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे 
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या सिझेरियनमुळे बाळासह पत्नीला गमावले. हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले.  न्यायासाठी काही वर्षे लढा दिल्यानंतर कुटुंबीयांनी आशा सोडली. अखेर, ६ वर्षांनी जेजे रुग्णालयाच्या आलेल्या अहवालात डॉक्टरांचा निष्काळजीपणा स्पष्ट झाला आणि पोलिसांनी राजावाडी रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

मूळचे बिहारचे रहिवासी असलेले  सोहराब अख्तर अन्सारी (४०)  नाशिकमध्ये एका कंपनीत चालक म्हणून काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी गरोदर राहिल्याने मुंबईत भाड्याने घर घेत राजावाडी, सायन रुग्णालयात उपचार सुरू केले. २० सप्टेंबर २०१६ रोजी पत्नीला प्रसूतीकळा सुरू झाल्याने राजावाडी रुग्णालयात दाखल केले.  
सगळे अहवाल नॉर्मल असताना डॉक्टरांनी सिझेरियन करावे लागणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ७ वाजता तिला स्ट्रेचरवरून ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना ती शुद्धीवर होती. त्यानंतर मात्र रात्री १० वाजल्यापासून डॉक्टरांकडून कधी औषधांसाठी तर कधी रक्ताच्या बाटल्यांसाठी पळविणे सुरू झाले.  
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पत्नीला भेटण्याचा आग्रह धरताच ऑपरेशन थिएटरमध्ये पत्नी निपचित पडलेली दिसून आली. रात्री पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगून

२१ सप्टेंबर रोजी ऑक्सिजनवर असलेल्या पत्नीला सायन रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान आधी मृत  बाळ  हातात दिले. त्यानंतर, पत्नीला वाचविण्यासाठी गर्भाशयही काढले. अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि २२ तारखेला तिचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.

टिळकनगर पोलिसांकडे तक्रार दिली. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून प्रकरण बुहन्मुंबई महापालिका, सार्वजनिक आरोग्य खाते, माता मृत्यू अन्वेषण समिती, कुटुंब कल्याण विभाग, मुंबई यांनी तसेच तज्ज्ञ समिती, जेजे समूह रुग्णालय यांच्याकडे पाठविले होते. अखेर, ६  वर्षांनी जेजेच्या अहवालात  डॉक्टर प्रवज्योत मनचंदा व डॉक्टर मेघा धर्मदासरी यांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला असल्याचे नमूद केले. हा अहवाल पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

माझी मुले पोरकी झाली... 
डॉक्टरांच्या चुकीच्या ऑपरेशनमुळे माझी मुले पोरकी झाली. तसेच, सुरुवातीचे काही वर्षे लढा दिल्यानंतर न्यायाची अपेक्षा सोडली होती. सध्या तिन्ही मुलांना गावी ठेवून नाशिकमध्ये नोकरी करून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहे. आता किमान संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.  - सोहराब अख्तर अन्सारी, तक्रारदार

लवकरच अटकेची कारवाई 
डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवत लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी सांगितले. 

Web Title: A smiling family is ruined by a doctor's mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.