Join us  

रमेश देशमाने यांच्या कलाकृतींचे एकल प्रदर्शन, फ्री प्रेस जर्नल कलादालनात भावस्पर्शी कलाविष्कार

By संजय घावरे | Published: May 13, 2024 3:55 PM

फ्री प्रेस जर्नल कलादालनात भरणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७  वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असेल.

मुंबई - चित्रकार रमेश विश्वनाथराव देशमाने यांच्या कलाकृतींचे एकल कलाप्रदर्शनाचा आनंद मुंबईकरांना लुटता येणार आहे. १५ ते ३० मे दरम्यान नरिमन पॉईंट येथील फ्री प्रेस भवनातील फ्री प्रेस जर्नल कलादालनात भरणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७  वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असेल.

या चित्रप्रदर्शनातील त्यांची चित्रे मानवी जीवनातील संवेदनशील भावनांचे प्रकटीकरण करणारी आहेत. चारकोल, कलर पेन्सिल, ड्राय सॉफ्ट पेस्टल, मिक्स मिडीयम, जलरंग वगैरेचा कलात्मक वापर करून रेखाटलेली चित्रे त्यातील स्पष्ट व बोलक्या रेषा आणि योग्य रंगसंगती यांचा मेळ दर्शवणारी आहेत. त्यांनी कार्ड पेपरवर काढलेली विविध चित्रे, गणपतीच्या विविध भावमुद्रा, त्याची देहबोली तसेच गणेशपूजनाचे प्रत्येक कामाच्या प्रारंभी असणारे महत्व यावर प्रकाश टाकतात. मानवी मनातील विविध भावोत्कट संवेदना व त्यांची विविधता दर्शविताना त्यांनी स्त्री व पुरुष यांच्या परस्पर नात्यातील संवेदनात्मक पैलू आणि त्यात सामावलेल्या भावना जसे आनंद, हर्ष, उत्कंठा, उत्सुकता, प्रतिक्षा, विरह तसेच मनोमीलनातील समन्वयानंतर प्रकटणारी प्रेमळ माया व ममता यांनी त्यांची भारलेली मनस्थिती यावर आधारित त्यांची चित्रे येथे सादर केली जातील. त्यात त्यांच्या मूळ संकल्पनातील स्पष्टता व आशयघनता, वैचारिक संकल्पना, त्यात असणारी विविधता तसेच कलाकाराची कल्पकता व कलात्मकता त्याचप्रमाणे सौंदर्यदृष्टी यांचे एक नितांतसुंदर कलात्मक दर्शन घडेल. हि चित्रे  भारतीय चित्रकलेतील स्पष्ट, प्रभावी रेषा आणि त्यातील आशयानुसार रंगलेपन ही कलात्मक वैशिष्ट्ये फार प्रकर्षाने व उत्कटतेने मांडतात आणि आपल्या बोलकेपणामुळे व स्पष्टतेमुळे सर्व रसिकांशी सुसंवाद साधतात व त्याची दाद मिळवितात.

रमेश देशमाने मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन ड्रॉईंग व पेंटिंगचे क्लास घेऊन त्यात विविध पैलू आणि तंत्रशुद्ध चित्र-संकल्पना व त्याची मांडणी यांची रचनात्मक व कलात्मक वैशिष्ट्ये शिकवितात. इलिमेंटरी व इंटरमिडिएट या ड्रॉईंगच्या परीक्षा, परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना व इच्छुकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या चित्रकला व ड्रॉईंग क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना वर्ल्ड जिनियस रेकॉर्ड्स नायजेरिया या जगप्रसिद्ध कलाप्रवर्तक संस्थेकडून पुरस्कार व मानसन्मान लाभला आहे. गेल्या २६ वर्षांपासून श्री सनातन धर्म विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, चेंबूर, मुंबई येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

रमेश देशमाने यांचे कलाशिक्षण गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट औरंगाबाद येथे झाले. नंतर उर्वरित शिक्षण त्यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे घेतले. त्यांनी विविध विषयावरील आधारित आणि वेगवेगळ्या माध्यमातून काढलेली आशयघन चित्रे व ड्रॉईंग्ज एकल व सामूहिक कलाप्रदर्शनांतून मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नवी दिल्ली, पुणे वगैरे ठिकाणी रसिकांपुढे ठेवलीत. त्यांचा चित्र सादरीकरणास नेहमी रसिकांचा कलाप्रेमींचा व संग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे त्यांना उत्तेजन तसेच प्रेरणा लाभली आहे व पुढील सादरीकरणासाठी उत्साह व उमेद मिळाले आहे. अनेक मान्यवर संस्थांकडून व कलाप्रवर्तकांकडून त्यांना मानसन्मान व पुरस्कार मिळाले आहेत आणि बऱ्याच सुविख्यात कलासंग्राहकांकडे व कलाप्रवर्तक संस्थांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत. मुंबईतील बऱ्याच संस्थांकडून आयोजित आर्ट वर्कशॉप मध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला आहे व चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. इटली, पॅरिस, जर्मनी, हॉंगकॉंग, अमेरिका वगैरे ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय संग्राहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत.

टॅग्स :मुंबई