"लग्नाआधी जो मुलगा अमर असतो, तो लग्नानंतर आमीर होऊन जातो"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:48 PM2023-02-06T13:48:41+5:302023-02-06T13:54:12+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांनीच वेळ व तारीख ठरवावी, मी सविस्तर चर्चा करायला तयार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे
मुंबई - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवरुन पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच, लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता, सुप्रिया सुळेंचं हे आव्हान भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी स्विकारलं असून त्यांनी आपण उदाहरणासह यावर सविस्तर चर्चा करायला तयार आहे, असेही म्हटले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीच वेळ व तारीख ठरवावी, मी सविस्तर चर्चा करायला तयार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. लव्ह जिहाद नेमकं कशाला म्हणतात याची असंख्य उदाहरण द्यायला तयार आहे. हिंदू मुलींना कसं फसवलं जात, त्यांच आयुष्य कस बर्बाद केल जात हे मी दाखवून देईन, त्या मुलींना प्रत्यक्ष भेट घालूनही देणार असल्याचं राणेंनी म्हटलं.
लग्नाआधी जो मुलगा अमर असतो तो लग्नानंतर आमीर होऊन जातो. लग्नानंतर हिंदू भगिनीला नाव बदलायला सांगत इस्लाम स्विकारायला सांगितलं जातं. मुलीनं ते ऐकलं नाही तर थेट मारूनही टाकण्यात येत. वास्तव समोर आल्यावर सुप्रियाताई ह्याही आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील. वेळ अणि तारीख ठरवा, मी तुमच्या ज्ञानात भर टाकणार, असे म्हणत नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं आहे.
लव्ह जिहादबद्दल काय म्हणाळ्या सुप्रिया सुळे
राज्यात मोर्चे काढण्याची एक नवी पद्धत निघाली आहे. हे मोर्चे तुम्हाला फक्त हे सांगतात की, काय खायचं, लग्न कुणाशी करायचं, एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहोचली जाते, असेही सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवर बोलताना म्हटले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्च्यातून करण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांनी मात्र, या मोर्चाची खिल्ली उडवत लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही, असे म्हटले होते.