अशी कशी नशीबानं थट्टा मांडली...; अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:33 PM2022-08-07T14:33:12+5:302022-08-07T14:33:44+5:30
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या बंडात शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. अमृता फडणवीसांवर टीका करताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गाणं गाऊन खिल्ली उडवली आहे. दरवेळी उद्धव ठाकरेंवर विषारी बाणाने टीका करणे त्यातून उलट उद्धव ठाकरेंची आणखी प्रसिद्धी होते असं सांगत पेडणेकरांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, आमच्या विधानसभेच्या संघटक अनुपमा परब यांनी एक गाणं लिहिलं आहे. मी गायिका नाही. कलाकार नाही. गद्यभाषेत मी बोलून दाखवेन. आवडलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. "एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव. मुख्यमंत्रिपदासाठी कटकारस्थानं केली, त्यांना एका अमृताची दृष्ट लागली हो..त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रिपद आले. अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली, अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली" अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.
अमृता फडणवीसांनी केली होती टीका
जून महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथींदरम्यान शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या या बंडात शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. उद्धव ठाकरेंवर ओढवलेल्या या नामुष्कीवरून अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली होती. कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकलं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असं विधान अमृता फडणवीस यांनी बस बाई बस या कार्यक्रमात केलं होतं. त्यावर शिवसेना नेत्यांनी आज प्रत्युत्तर दिले.
या कार्यक्रमात सूत्रसंचालक अभिनेता सुबोध भावे यांनी कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकल्यावर कुणाचा चेहरा डोळ्यांसमोर येतो असं विचारण्यात आलं असता अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे असं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते, पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.