शिवकालीन शस्त्रास्त्रांचे लवकरच फिरते संग्रहालय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:05 PM2023-12-07T21:05:53+5:302023-12-07T21:06:04+5:30
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयांतर्गत होणाऱ्या या उपक्रमासाठी राज्य शासनाने तब्बल नऊ कोटी नऊ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत शिवराज्याभिषेक निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमासाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आता राज्यात लवकरच शिवकालीन शस्त्रांस्रांचे फिरते संग्रहालय आयोजित करण्यात येणार आहे.
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयांतर्गत होणाऱ्या या उपक्रमासाठी राज्य शासनाने तब्बल नऊ कोटी नऊ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या फिरत्या संग्रहालयासोबत विद्यार्थ्यांसाठी विशेषतः हुबेहुब शिवकालीन शस्त्र आणि आयुधांच्या प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून या शस्त्रास्त्रांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधीही मिळणार आहे. या सर्व उपक्रमाचे नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाची असणार आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने लहानग्यांसह, अभ्यासक, संशोधकांना शिवकालीन शस्त्रांमधील तलवारी, कट्यारी, जांबिया, भाले, बचीर्, ढाली, चिलखत, वाघनखे, गुप्ती, जिरेटोप, जांबिए, खंजीर, कुऱ्हाडी, मुठी, तोफगोळे, धनुष्यबाण, दांडपट्टा पाहता येणार आहे. याखेरीज, त्या काळातील नाणीही पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे, राज्य शासनाच्या या उपक्रमात पहिल्यांदाच शस्त्रांस्त्रांचे प्रात्यक्षिकही अनुभवता येणार आहे.