मुंबई - काष्ठकलेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्राचीन काष्ठोपजी वृक्षाची विविध स्वरुपाची उपयुक्तता आहे. याचे दस्ताऐवजीकरण करण्याच्या हेतूने राज्याच्या दर्शनिका विभागाने काष्ठोपजी वृक्षावर आधारित स्वतंत्र गॅझेटिअरचा प्रकल्प हाती घेतला आहे. या गॅझेटिअरमध्ये लाकडासंदर्भातील परिपूर्ण माहिती अंतर्भूत करण्यात येणार आहे.दर्शनिका विभागाच्या हिरक वर्षपूर्तीनिमित्त हाती घेण्यात आलेल्या नव्या संकल्पनापैंकी या गॅझेटिअरचे काम सुरु असल्याची माहिती दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली आहे. या गॅझेटिअरसाठी पुणे विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. गणेश चिंचणीकर देखील सहाय्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. या गॅझेटिअरमध्ये राज्यात काष्ठोपजी किती वृक्षे आहेत, त्याची उपयुक्तता काय, मुख्यतः कोणत्या ठिकाणी ही वृक्षे आढळतात, वृक्षांची छायाचित्रे, काष्ठापासून तयार केलेल्या कलाकृतींची माहिती - छायाचित्रे, काष्ठाची वैशिष्ट्ये आणि त्याचे वनस्पतीशास्त्रीय मूळ नाव अशा सर्व बाजूंनी माहितीचा आढावा घेण्यात येणार आहे, असे डॉ. बलसेकर यांनी सांगितले.गॅझेटिअरमध्ये सुमारे ३५०हून विविध प्रकारच्या झाडांचा समावेश करण्यात आला आहे. दर्शनिका विभागाकडून या गॅझेटिअरचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी हे गॅझेटिअर उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी, या गॅझेटिअर संदर्भात ब्रिटीश काळात काम झाले होते, मात्र त्यावेळेस हे इंग्रजी भाषेत करण्यात आले होते. आता मात्र हे मराठीत उपलब्ध होणार आहे.
प्राचीन काष्ठोपजी वृक्षावर विशेष गॅझेटिअर, दर्शनिका विभागाचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 9:27 PM