"शरद पवारसाहेब पुन्हा दंड थोपटून उभे आहेत"; चिन्ह अनावरणानंतर आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 03:52 PM2024-02-24T15:52:56+5:302024-02-24T15:55:13+5:30
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
NCP Sharad Pawar Party Symbol ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच 'तुतारी वाजवणारा माणूस' हे नवं चिन्ह दिलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी याच चिन्हासह मतदारांसमोर जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज शरद पवार यांच्या उपस्थितीत या चिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला. छत्रपतींचा आदर्श नजरेसमोर ठेऊन राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, असं शरद पवार यावेळी म्हणाले. या सोहळ्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवार यांच्या पक्षाला शुभेच्छा देताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे की, "विरोधात असणाऱ्या पक्षांना फोडायचं आणि अधर्माने संपवायचं हीच नीती असणाऱ्या नीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब पुन्हा एकदा दंड थोपटून उभे राहिले आहेत. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' या पक्षाचे नवीन चिन्ह 'तुतारी' घेऊन आजपासून जनतेत जात आहेत. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा."
विरोधात असणाऱ्या पक्षांना फोडायचं आणि अधर्माने संपवायचं हीच नीती असणाऱ्या नीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब पुन्हा एकदा दंड थोपटून उभे राहिले आहेत. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' ह्या पक्षाचे नवीन चिन्ह 'तुतारी' घेऊन आजपासून जनतेत…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 24, 2024
सर्वांत लोकप्रिय चिन्ह ठरणार, जयंत पाटलांना विश्वास
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे चिन्ह लवकरच लोकप्रिय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला, देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथे आलेला आहे. सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्र आणि जनतेला सांगतोय, वय महत्त्वाचं नसतं इर्ष्या महत्त्वाची असते, मनाची ताकद आणि मनाची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. आजपासून पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या महाराष्ट्राने साथ द्यावी. महाराष्ट्रातील रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभी राहील हा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलूखामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे," असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.