मुंबई - राजधानी मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. वेगात आलेल्या एर्टिगा कारची वीजेच्या खांबाला धडक बसून कारचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. अपघाताची तीव्रता पाहून स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमधून प्रवास करणाऱ्या २ मुलींसह ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एर्टिगा कार वेगाने चेंम्बुरकडे जात होती. मात्र, SCLR ब्रीजजवळ पोहोचताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने एका वीजेच्या खांबाला जोरात धडक दिली. गाडीचा वेग अधिक असल्याने कारचे जागेवरच दोन तुकडे झाले. तुटलेल्या गाडीचा फोटो पाहून अपघाताची भीषणता आणि गाडीचा वेग लक्षात येईल.
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली, तर पोलिसांनाही सांगण्यात आले. घटनेच्या १ तासानंतर स्थानिक व पोलिसांच्या मदतीने खांबाला अडकून पडलेल्या गाडीतील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कारमधून ५ प्रवासी प्रवास करत होते. त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.