मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची मुंबईत पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व मंत्री मंत्रालयात उपस्थित होते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहत ही महत्वाची बैठक मानली जात होती. मात्र या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या विविध धोरणांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच उद्या म्हणजेच २९ जून रोजी देखील कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्य सरकारमध्ये सध्या सर्व काही ठीक असल्याचं स्पष्टीकरणही सुभाष देसाई यांनी यावेळी दिलं.
महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखी मध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.