मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:08 IST2023-07-28T13:04:29+5:302023-07-28T13:08:04+5:30
आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भाषण करत असताना गुलाबराव म्हणाले, टांगा पलटी, घोडे फरार; सभागृहात एकच हशा
मुंबई: इर्शाळवाडीत दिखाव्यासाठी गेलो नाही. आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही. दरडग्रस्तांची तात्पुरती कंटेनरमध्ये सोय करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात दिली. राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्याचा पाचवा दिवस आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध कामांची माहिती दिली.
कृषी सेवकाचं मानधन वाढवून १६ हजार रुपये करण्यात आले. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे. विरोधकांनी टीका केल्या आम्ही कामातून प्रत्युत्तर देतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढ्यापुरती आमची जबाबदारी नाही. आम्ही तोंडाची वाफ दवडत बसत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
आमच्या कामाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे काही जणांची पोटदुखी होतेय, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते जनतेच्या भल्यासाठी घेतले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत, रस्त्यावरील चिखल तुडवत पाहणीला जातो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जनतेचं हित लक्षात घेऊनचं निर्णय घ्यायला हवे. आपला अहंकार राज्याला १५-२० वर्षे मागे घेऊन जाईल. आम्ही टांगा पलटी केला, नसता तर आपण १५-२० वर्षे मागे गेलो असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हे विधान बोलताचं मागे बसलेले मंत्री गुलाबराव पाटील 'टांगा पलटी, घोडे फरार', असं म्हणाले. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खळखळून हसू लागले.
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३ | LIVE https://t.co/Vptqn8noPp
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 28, 2023