लोकसभेसाठी माधुरी दीक्षितसह ‘या’ नावांची जोरदार चर्चा, मुंबईत नवं समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:39 AM2023-11-22T11:39:16+5:302023-11-22T11:40:21+5:30
नव्या राजकीय समीकरणाने मुंबईतील सहा मतदारसंघाचे चित्र बदलले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी निवडणुकीत मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदललेले आहे.
आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढू असा ठाम दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी केला आहे; मात्र शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट विरुद्ध ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित आघाडी यांची इंडिया आघाडी यांच्यात काटे की टक्कर अपेक्षित आहे.त्यामुळे सत्ताधारी युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधकांसाठी आगामी लोकसभा निवडणूक २०१९ इतकी सोपी नाही, अशी चर्चा मतदारांमध्ये आहे.
पूनम महाजन की माधुरी दीक्षित?
उत्तर मध्य मुंबईतून खासदार पूनम महाजन यांना परत तिकीट मिळणार का? धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या उमेदवारीतून येथे नवा चेहरा देणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर काँग्रेसमधून बाबा सिद्धीकी आणि नसीम खान यांच्या नावांची सुद्धा चर्चा सुरू आहे.
रोज नव्या नव्या चर्चा...
उत्तर पूर्व मुंबईतून खासदार मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणार की, नवा चेहरा भाजप देणार का, अशी चर्चा आहे. तर आदेश आला तर येथून निवडणूक लढवू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शरद पवार गटाचे संजय पाटील परत येथून निवडणूक लढवणार का? ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राऊत यांना ही जागा सोडणार का, अशी नवी चर्चा सुरू आहे.
वडील - मुलगा यांच्यात थेट लढत ?
उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजप पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते व उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर व शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्यात विकोपाला गेलेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या दोन्ही नेत्यांनी भेट घेतल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आपल्या वाणीला विराम दिला आहे.
यामुळे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून वडील गजानन कीर्तिकर विरोधात ठाकरे गटातून मुलगा व उपनेते अमोल कीर्तिकर यांच्यात थेट लढत होणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विद्यमान खासदार
उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी (भाजप)
उत्तर पश्चिम मुंबई - गजानन कीर्तिकर(शिंदे गट)
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन (भाजप)
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे (शिंदे गट)
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (ठाकरे गट)
उत्तर पूर्व मुंबई - मनोज कोटक (भाजप)
मुंबईत दक्षिण मुंबई,दक्षिण मध्य मुंबई,उत्तर मध्य मुंबई,उत्तर पूर्व मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत.
उत्तर मध्य मुंबई,उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मुंबई हे तीन लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत.
शिवसेनेच्या फुटीनंतर दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,तर दक्षिण मध्य मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई हे शिंदे गटाकडे आहे.
महाविकास आघाडीत तर अनेक दावेदार