मुंबई विद्यापीठातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधा प्रकरणाचे तीव्र पडसाद
By रेश्मा शिवडेकर | Published: April 20, 2024 10:32 PM2024-04-20T22:32:32+5:302024-04-20T22:32:49+5:30
हॉस्टेलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त लोकमतने २० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
परीक्षा तोंडावर असताना जुलाब, पोटदुखीने हैराण झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनींविषयीच्या वृत्ताचे शनिवारी तीव्र पडसाद उमटले. या विद्यार्थिनींना उपचार तर सोडाच, विद्यापीठ प्रशासनाकडून विचारपूसही कऱण्यात आली नव्हती.
हॉस्टेलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त लोकमतने २० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ते वाचल्यानंतर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ तेथील बाधित मुलींशी आणि विद्यापीठ प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच, सायंकाळी हॉस्टेलला भेट देऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली. तर उद्धवसेनाप्रणित युवा सेनेच्या नेत्यांनी हॉस्टेलला धडक देत विद्यापीठ प्रशासनाला फैलावर घेतले.
विद्यार्थिनींना विषबाधा वसतिगृहाला पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाली, याची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेचे नेते प्रदीप सावंत यांनी केली आहे. त्यांच्यासमवेत माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन वॉर्डन डॉ. मधुरा कुलकर्णी तसेच विद्यापीठाचे अभियंता आणि बाधीत विद्यार्थिनींची भेट घेऊन जाब विचारला.
युवा सेनेने कुलगुरु प्रा रविंद्र कुळकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची माहिती दिली. विद्यार्थिनींना झालेल्या त्रासानंतर हॉस्टेलमधील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल सोमवारी दिला जाणार आहे.
युवा सेनेच्या मागण्या
-हॉस्टेलमध्ये पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहे. उर्वरीत दोन अजुन कार्यान्वित नाही. ते दोनही कुलर तातडीने वापरात आणावे.
-विद्यार्थिनींना तातडीने औषधोपचार मिळावा यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा.
हल्लीचे कुलगुरू विद्यार्थी हीत जपणारे नाहीत. विद्यापीठाची नैतिक व प्रशासकीय दहशत संपली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये तर अनागोंदीच माजली आहे.
- अॅड. मनोज टेकाडे, प्रहार विद्यार्थी संघटना