Join us

क्लायमेट चेंजमुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामांसाठी अभ्यास गट समिती स्थापन करणार

By मनोहर कुंभेजकर | Published: December 13, 2022 12:43 PM

या वेळी पावसाळ्यात मासेमारी बंदी काळात खावटी देण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले

मुंबई-वेळी अवेळी पडणारा पाऊस, वादळवारा, वातावरणातील बदल यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आला असल्याने त्याचा अभ्यास करून मच्छीमारांना भरपाई देण्याबरोबर परिणामांची तीव्रता कमी करण्याबरोबर याबाबतीत ध्येय धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधानपरिषदचे आमदार रमेश  पाटील यांच्या शिष्टमंडळा सोबत सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीत दिले.

आमदार रमेश  पाटील यांनी मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून वातावरण बदलामुळे पारंपारिक मासेमारी आणि मासळी सुकविण्याच्या व्यवसायात कोळी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांना भरपाई आणि उपाय योजना आखली जावी म्हणून अभ्यास गट समिती गठीत करण्याची मागणी केली होती. या बैठकीत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके,भाजपचे महाराष्ट्र मच्छिमार सेलचे अध्यक्ष ॲड. चेतन पाटील उपस्थित होते.

या वेळी पावसाळ्यात मासेमारी बंदी काळात खावटी देण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले. वेसावा आणि सातपाटी खाडीचा गाळ काढण्याची गरज लक्षात घेता २४७ कोटींचा निधी वितरित करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. त्याबरोबर चित्रा खलिजा तेलवाहु नौकांची झालेल्या टक्करीमुळे मासे विक्री करणाऱ्या महिलांचा निधी निर्देशा अभावी कोर्टात प्रलंबित असल्याने तज्ञ वकिला मार्फत कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्याचे निर्देश मंत्रीमहोदयांनी  दिले.