Join us  

घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:16 AM

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अंती मुंबई हे शहर घरांच्या भाववाढीत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अंती मुंबई हे शहर घरांच्या भाववाढीत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. याच क्रमवारीत दिल्ली शहराने पाचवा क्रमांक गाठला आहे.

बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या नाइट फ्रँक कंपनीने प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२४ (पहिली तिमाही) या नावाने एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले असून, त्याद्वारे ही माहिती पुढे आली आहे. यानुसार, गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीमध्ये मुंबई शहर हे जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर होते. मात्र, गेल्या वर्षभरात मुंबईत दीड लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे मुंबई शहरातील किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे घरांच्या भाववाढीमध्ये मुंबई शहर हे सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. यात मुंबईतील मालमत्तांच्या किमतीमध्ये सरासरी ४.४ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. दिल्लीच्या किमतीही वाढ झाली असून, १७ व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे.

मनिला शहर अव्वल-

जागतिक क्रमवारीत फिलिपिन्सची राजधानी असलेले मनिला शहर पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या भाववाढीत मनिला शहराने आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. तेथील घरांच्या किमतीमध्ये गेल्या काही महिन्यांत सरासरी २६ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर, जपानची राजधानी असलेले तोक्यो शहर या क्रमवारीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१) या दोन प्रमुख शहरांच्या तुलनेत बंगळुरू शहरातील घरांच्या किमतीमध्ये नगण्य घसरण झाली आहे. 

२) त्यामुळे बंगळुरू शहर या क्रमवारीत १६ व्या क्रमांकावरून १७ व्या क्रमांकावर घसरले आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगबेंगळूरजपानदिल्ली