सफाई कामगाराचा रुग्ण मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; सरकारी रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:33 PM2023-10-10T14:33:02+5:302023-10-10T14:33:25+5:30
या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई : सरकारी रुग्णालयात एका १५ वर्षीय मुलीवर वॉर्डमध्येच सफाई कामगाराने अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी सफाई कामगार रोहिदास दयालाल सोळंकी (४०) याला अटक केली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईची रहिवासी असलेल्या १५ वर्षीय मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मुलीला लघवीच्या ठिकाणी लावण्यात आलेला पाइप काढून टाकला होता. त्यामुळे बेड व डायपर खराब झाल्याने आई तेथील पडदे लावून मुलीचे डायपर बदलत असताना रोहिदास तेथे आला. त्याने, आधी खराब झालेले डायपर बाथरूममध्ये फेकून येण्यास सांगितले. मुलीची आई परतताच मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तेव्हा रुग्ण महिलेने सांगितले की, सफाई कामगाराने मुलीसोबत अश्लील वर्तन करत लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने तत्काळ घडलेला प्रकार तेथील निवासी डॉक्टरांना सांगितला. या प्रकाराने खळबळ उडाली.
या पूर्वीच्या घटना
- रुग्णालयाच्या शौचालयात लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
- आईसोबत सोनोग्राफीसाठी आलेल्या नऊ वर्षांच्या मुलीला याच सरकारी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात नेत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना एप्रिल महिन्यात घडली होती. या प्रकरणी जेजे मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा नोंदवला.
निवासी डॉक्टरला मिठी
रुग्णालयात कार्यरत असलेली तक्रारदार निवासी डॉक्टर येथीलच वसाहतीत राहण्यास आहे. रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास काम उरकून घराच्या दिशेने निघाल्या. त्याच दरम्यान आरोपी कक्षसेवकाने दारूच्या नशेत पाठीमागून येत त्यांना मिठी मारली. त्यांनी त्याच्या तावडीतून सुटका करत आरडाओरडा करताच कक्षसेवकाने पळ काढला. जेजे मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली. २०२० मध्ये ही घटना घडली होती.