प्रकल्पांसोबतच भाजपला हवी महाराष्ट्रातील नेत्यांची साथ; गुजरातमध्ये राज्यातील नेत्यांची कुमक
By यदू जोशी | Published: October 30, 2022 08:00 AM2022-10-30T08:00:33+5:302022-10-30T08:00:41+5:30
निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही जणांना पाठविले जाणार आहे.
- यदु जोशी
मुंबई : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये पळविले जात असतानाच तेथील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची मदत घ्यावी लागली आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमधील सहा जिल्ह्यांमध्ये ५० हून अधिक नेत्यांची कुमक पाठविण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखी काही जणांना पाठविले जाणार आहे.
मुंबईतील पक्षाचे आमदार योगेश सागर आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या नेतृत्वात एकूण १२ आमदार आणि अन्य पदाधिकारी अशा ५० जणांची एक टीम तयार करण्यात आली आहे. गुजरातमधील सहा जिल्ह्यांच्या ३३ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. दक्षिण गुजरातमधील डांग, वलसाड, नवसारी, सुरत, तापी आणि भरुच या सहा जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. हे सगळे जण काही दिवसांपासून गुजरातचे दौरे करीत आहेत. निवडणूक जाहीर होईल त्या दिवशीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत हे सगळे गुजरातमध्येच मुक्कामी असतील.
मुंबईत गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. येथील गुजराती समाजाच्या नेत्यांशी गुजरातमध्ये असलेला कनेक्ट लक्षात घेऊन त्यांना या मोहिमेवर धाडण्यात आले आहे. या शिवाय गुजरातला लागून असलेल्या जळगाव, नाशिक जिल्ह्यांतील आमदारांवरही जबाबदारी टाकण्यात आली आहे. योगेश सागर यांच्यासह मनीषा चौधरी, संजय सावकारे, संजय केळकर, पराग अळवणी, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते, निरंजन डावखरे, सुरेश भोळे, राहुल ढिकले, राजेश पाडवी, उमा खापरे या आमदारांच्या खांद्यावरही जबाबदारी दिली आहे.
३३ मतदरासंघांतील पदाधिकाऱ्यांचे दौरे
३३ मतदारसंघांमधील भाजपचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातून पाठविण्यात आलेले नेते यांची एक बैठक सुरुवातीला सुरतमध्ये घेण्यात आली आणि नंतर दौरे सुरू झाले. महाराष्ट्रातून गेलेले नेते त्यांना वाटून दिलेल्या मतदारसंघांमध्ये लोकांचा फीडबॅक घेतात. सरकारी योजनांचा लाभ कोणाला आणि का मिळाला नाही याची माहिती घेऊन वंचित असलेल्यांना लाभ देण्यासाठी समन्वय साधतात.
भाजपचे शक्तिकेंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख यांच्या बैठका, गाव, शहरांतील प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेतात. धार्मिक, सामाजिक समीकरणांची माहिती घेतात. आमदार योगेश सागर आणि सुनील कर्जतकर यांना सगळे रिर्पोटिंग करतात. महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील भाजपचे आमदार, पदाधिकाऱ्यांना गुजरातच्या अन्य भागांत पाठविण्यात आले आहे.
घोषणेकडे लक्ष
गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेते आणि गुजरात मधील संबंधित नेते यांची एक बैठक होईल. आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन पुढची रणनीती निश्चित केली जाईल.