Uddhav Thackeray Shivaji Park Speech ( Marathi News ) : "आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहोत. आपण जसं जय श्रीराम म्हणतो, तसंच जय शिवराय हादेखील महाराष्ट्राचा मंत्र आहे. शिवरायांच्या मंदिरात आणि आसपासच्या भागात त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरले जातील," अशी घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यातील भाषणातून केली आहे. तसंच नरेंद्र मोदी आणि तुमच्या मिंध्यांना जसं वाटतं तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मतं मिळवण्याचे मशीन नाही, जो शिवाजी महाराजांच्या मंदिरांना विरोध करेल त्याला शिवरायांचा महाराष्ट्र बघून घेईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता १०० वर्ष पूर्ण होत आहेत. मला संघाबद्दल आदर आहे, मोहन भागवत यांच्याबद्दल आदर आहे, मात्र ते जे काही करत आहेत त्याच्याबद्दल आदर नाही. मला मोहन भागवत यांना विचारायचं आहे की, तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहेत, त्या कोणासाठी सांगत आहात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की, हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे आता जे १० वर्षांपासून सत्तेत बसले आहेत, ते हिंदूंचं संरक्षण करू शकत नाहीत का? आम्हीच आमचं संरक्षण करायचं असेल तर तुमची गरज काय?" असा खोचक सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.
एकनाथ शिंदेंवरही घणाघाती टीका
"दिल्लीवाल्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी त्यांना गाडून आपण भगवा फडकवणार आहोत. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून बाळासाहेबांची मशाल बनवून या सरकारला आग लावल्याशिवाय राहणार नाही. आपण हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही. आपण भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व बुरसटलेलं आहे. जा आणि त्या मिंध्यांना सांगा, तुमचा विचार म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही. त्यांनी आज जाहिरात केलीय की हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण. पण त्यांनी पुढच्या दोन वेळी लिहिल्या नाहीत की, अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे लोक आहेत. हे लांडगे आहेत," असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.