मुंबई: विलेपार्ले पूर्वच्या हॉटेल सहारा स्टार याठिकाणी आयोजित खासगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे लॅपटॉप गमवावे लागले. हाय सिक्युरिटी असलेल्या परिसरात सूटबुटात आलेल्या व्यक्तीने हा प्रकार केल्यामुळे हॉटेलच्या एकंदर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी एअर पोर्ट पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरू आहे.
हॉटेल सहारा स्टारमध्ये १४ डिसेंबर रोजी जाडे हॉल येथे सदर कंपनीच्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जवळपास ४०० ते ४५० लोक सहभागी झाले. तक्रारदार मिली शहा (२२) आणि त्यांची सहकारी तनुश्री जाना (२१) या देखील त्यांचा लॅपटॉप याठिकाणी कामानिमित्ताने घेऊन आल्या होत्या. ज्याची बॅग त्यांनी रिसेप्शन टेबल शेजारी ठेवली आणि अमांत्रिताना त्या मार्गदर्शन करू लागल्या. जवळपास संध्याकाळी ५ च्या सुमरास कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी त्यांची लॅपटॉप बॅग शोधली जी त्यांना कुठेच आढळली नाही. तेव्हा हॉटेल प्रशासनाच्या मदतीने त्यांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. ज्यात सूटबुटात असलेला एक व्यक्ती लॅपटॉप ठेवलेली बॅग उचलून निघून गेलेला त्यात दिसत होता. चोराने जवळपास १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून याप्रकरणी शहा यांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिल्यावर एअर पोर्ट पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.