भाजपाच्या एकूण १२ महिला आमदार; 'या' तिघी मानल्या जाताहेत मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 06:58 PM2022-08-10T18:58:02+5:302022-08-10T19:01:36+5:30
भाजपच्या 105 आमदारांच्या संख्याबळापैकी 12 महिला आमदार आहेत. त्यामुळे, 12 पैकी कोणत्या महिला आमदारांना संधी मिळेल किंवा मंत्रीपदासाठी कोणत्या आमदांरांची वर्णी लागेल, याची चाचपणी सुरू आहे
मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी समारंभ मंगळवारी सकाळी पार पडला. त्यामध्ये, एकूण 18 मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर, आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देण्यात आल्याने विरोधकांनी चांगलीच टिका केलीय. तसेच, या मंत्रिमंडळात एकही महिलाआमदाराचा समावेश नसल्याने पुरुषप्रधान मंत्रिमडळ असल्याचा टोलाही अनेक महिला नेत्यांना लगावला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्यामुळे, भाजपकडून कोणत्या महिला आमदारांना संधी मिळेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या 105 आमदारांच्या संख्याबळापैकी 12 महिला आमदार आहेत. त्यामुळे, 12 पैकी कोणत्या महिला आमदारांना संधी मिळेल किंवा मंत्रीपदासाठी कोणत्या आमदांरांची वर्णी लागेल, याची चाचपणी सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही सांगितले आहे. त्यामुळे, पावसाळी अधिवेशनानंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार हे निश्चित झालं आहे. मात्र, कोणत्या महिलांची वर्णी लागणार हे अनिश्चित आहे. तरीही, 3 महिला आमदारांनी नावे समोर आली आहेत.
नाशिकमधील 2 आणि पुण्यातील एका महिला आमदारांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. देवयानी फरांदे यांचेही नाव चर्चेत असून नाशिक मध्य मतदारसंघातून त्या आमदार झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर प्रदेश महिला मोर्चाच्या जबाबदारीसह चिटणीसपद दिले. तब्बल 9 वर्षे त्यांनी ही जबाबदारी यशस्वी पार पाडली. त्यानंतर, 2014 मध्ये झाल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारली, त्यानंतर 2019 लाही निवडणूक जिंकत सलग दोन वेळेस त्या आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या दुसऱ्या महिला आमदार आणि भाजप नेत्या सीमा हिरे यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. कारण, यंदा 2019 ला त्यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राला कमी मंत्रीपद मिळाली आहेत. त्यामुळे, पर्वती मतदारसंघातील माधुरी मिसाळ या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाच्या दावेदार मानल्या जातात. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीन वर्ष त्या निवडून आल्या आहेत. पुण्यातील भाजपचं वजनदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये त्यांनी पुण्याच्या भाजपच्या शहराध्यक्ष पदाची धुराही सांभाळली होती.
दरम्यान, शिंदे गटाकडून कोणत्या महिला आमदाराला मंत्रीपद मिळेल, हाही चर्चेचा विषय आहे. कारण, यामिनी जाधव यांच्यावर अगोदर ईडी चौकशीचं सावट आहे. त्यात, त्यांना मंत्रीपद दिल्यास पुन्हा एकदा मोठ्या टिकेचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागू शकतो. उर्वरीत 3 महिला आमदारांपैकी कोणाला संधी मिळेल हे विस्तारातच माहिती होईल.
भाजपच्या महिला आमदार
1. मंदा म्हात्रे - बेलापूर 2. मनिषा चौधरी - दहिसर 3. विद्या ठाकूर - गोरेगाव 4. भारती लव्हेकर - वर्सोवा 5.
माधुरी मिसाळ - पर्वती 6. मुक्ता टिळक - कसबापेठ 7. देवयानी फरांदे - नाशिक मध्य 8. सीमा हिरे - नाशिक पश्चिम 9. श्वेता महाले - चिखली 10. मेघना बोर्डीकर - जिंतूर
11. नमिता मुंदडा - केज 12. मोनिका राजळे - शेवगाव शिवसेनेच्या महिला आमदार
शिंदे गटाच्या आमदार
1. यामिनी जाधव - भायखळा 2. लता सोनवणे - चोपडा 3. मंजुळा गावित (अपक्ष आमदार) - साक्री मतदारसंघ (धुळे) 4. गीता जैन (अपक्ष आमदार) - मीरा-भाईंदर मतदारसंघ (ठाणे)