मुंबई : ट्रान्सफॉर्मर जळाला किंवा बिघडल्यास दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्यभर मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे माहिती मिळाल्यानंतर तीन दिवसात बिघडलेला ट्रान्सफॉर्मर बदलला जात आहे. मोबाईल ॲपवरील सुविधा वापरणे याकरीता ग्राहकांसाठी सोपे ठरू शकते, असा दावा महावितरणने केला आहे.
कशी कराल ॲपवरून तक्रार....
१) मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा
२) नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा
३) ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा
४) आपले कनेक्शन ज्या ट्रान्सफॉर्मरला जोडलेले आहे, त्याचा नंबर, गाव, तालुका व जिल्हा याची माहिती भरलेली दिसेल.
५) ट्रान्सफॉर्मर जवळची खूण कोणती आहे, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा
६) संबंधीत ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा
७) नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा
८) ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.
९) ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.