Join us

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, उंबरमाळी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 10:03 PM

Central Railway : उत्तर भारत आणि खान्देशातून येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत.

- शाम धुमाळ

मुंबई : मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हहेड वायरवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याण ते कसाराच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. उत्तर भारत आणि खान्देशातून येणाऱ्या रेल्वे गाड्या अडकून पडल्या. तसेच मुंबईहून खान्देश आणि उत्तर भारताच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या खोळंबल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ब्लॉक घेण्यात आला व  कसारा रेलवे स्टेशन हून कर्मचारी तात्काळ रवाना झाले आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. टॉवर व्हॅनच्या मदतीने विज कर्मचाऱ्यांनी सदर झाड बाजूला करून 9.45 मिनिटांनी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा वीज पुरवठा पूर्ववत केला. दीड तासाच्या आत्यावश्यक रेलवे ब्लॉकनंतर कसाराकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.....ओव्हरहेड वायरवर ज्यावेळी झाड पडले, त्यावेळी मोठा स्पार्क व शॉर्ट सर्किट झाले. परंतु झाड पडण्याच्या 8 मिनिट अगोदर मुंबई- मनमाड पंचवटी एक्सप्रेस त्या रेलवे ट्रॅकवरून कसारा दिशेला गेली होती, जर सदरचे झाड 8 मिनिट अगोदर कोसळले असते तर ते धावत्या पंचवटी एक्सप्रेसवर पडले असते व परिणामी मोठा अनर्थ घडला असता. केवळ दैव बालवत्तर म्हणून आज पंचवटी एक्सप्रेसमधील शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले. दरम्यान पंचवटी एक्सप्रेसच्या पाठोपाठ असलेली कसारा लोकल कल्याणहून 10 मिनिट उशिरा निघाल्याने 8.30 ला उंबरमाळीला असणारी कसारा लोकल खर्डी रेलवे स्टेशनलाच उभी होती. 

टॅग्स :मध्य रेल्वे