टीव्ही अभिनेत्याला फ्लॅट खरेदीत १.३ कोटी रुपयांना फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:27 AM2023-11-23T10:27:13+5:302023-11-23T10:28:06+5:30
बुकिंग फ्लॅटची परस्पर दुसऱ्यांना विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीव्ही अभिनेत्याची फ्लॅट खरेदीत चांगलीच फसवणूक झाली. आपण बुक केलेला फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विक्री करण्यात आला, असे सांगत याप्रकरणी अभिनेता समीर कोचर याने अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी मंगळवारी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका जोडप्याला २०२० मध्ये वांद्रे येथे कार्यालयीन कामासाठी फ्लॅट खरेदी करण्यासाठी आगाऊ पैसे दिल्यानंतर माझी आणि मित्राची १.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करताना आरोप केला आहे. या जोडप्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. आरोपींची नावे प्रणित नाथ आणि त्यांची पत्नी अमिषा अशी असून यांनी कोचरने बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर भलत्यात लोकांना विक्री केली असे त्याचे म्हणणे आहे.
सामंजस्य करारानंतर पैसे केले वसूल
या जोडप्याने ३० मार्च २०२१ रोजी काम पूर्ण झाल्यावर अंतिम रक्कम स्वीकारण्याचा सामंजस्य करार केल्यावर कोचर यांच्याकडून ५८.५ लाख रुपये आणि त्याचा मित्र वरुण बंगेरा यांच्याकडून ४४.७ लाख रुपये वसूल केले. अधिक चौकशीत आरोपींनी हे फ्लॅट सचेत पांडे नावाच्या व्यक्तीला विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार या प्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
न्यायालयात धाव
तक्रारीनुसार, नाथ दाम्पत्याने कोचर आणि बंगेरा यांना वांद्रे पाली गावातील एका भूखंडावर चार मजली इमारत बांधणार असल्याचे सांगितले होते. अंधेरी (पूर्व) येथे राहणाऱ्या नाथ दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता आणि त्याच्या मित्राने २०२० मध्ये धनादेशांसह आगाऊ पेमेंट केले. त्यांना नाथने जूनमध्ये व्हॉट्सॲपवर मेसेज करत तो त्यांना फ्लॅट विकू शकत नाही, असे कळविले आणि तक्रारदाराने याविरोधात न्यायालयात
धाव घेतली.