Join us  

"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..."; मिलिंद नार्वेकरांच्या त्या चुकीवर शिंदे गटाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 6:15 PM

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावर ट्विट केलंय.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्याकडून एक चूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अधिवेशन काळात सुरक्षा रक्षकांकडून चोख बंदोबस्त असतो. त्यात सभागृहात केवळ आमदारांना प्रवेश दिला जातो. मात्र असे असताना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सभागृहात बसल्याचं पाहायला मिळाले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र आदित्य ठाकरेंच्या ही चूक निदर्शनास यांनी मिलिंद नार्वेकरांना लक्षात आणून दिले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सभागृहाबाहेर गेले. 

मिलिंद नार्वेकर यांच्या या एका चुकीमुळे पुन्हा एका चर्चांना उधाण आलं आहे. मिलिंद नार्वेकर सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतात, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. तसेच त्यांची सर्वांशी जवळीक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं एकदम खास नातं आहे. दरवर्षी गणपतीला देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतही त्यांचं खास नातं आहे. शिंदेही दरवर्षी त्यांच्या घरी जातात. सर्व पक्षांशी नातं असलेला मिलिंद नार्वेकर एकमेव कार्यकर्ता आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. तसेच शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही यावर ट्विट केलंय. ''मला आमदार झाल्यासारखं वाटतंय'', असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे. 

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?

५५ वर्षीय मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे खासगी स्वीय सहाय्यक आहेत. २०१८ मध्ये शिवसेना सचिवपदी नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली. १९९४ पासून मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि नेते, कार्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून ते काम करतात. उद्धव ठाकरेंच्या राजकीय दौऱ्यापासून ते प्रत्येक कामात मिलिंद नार्वेकर भूमिका निभावतात. १९९० मध्ये शाखाप्रमुखपदासाठी मुलाखत देण्यासाठी ते मातोश्रीत पोहचले होते. तेव्हा त्यांच्या स्वभाव गुणांनी प्रभावित होऊन उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुखऐवजी त्यांना खासगी स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्त केले. कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय नार्वेकरांनी राजकारणात प्रवेश केला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीत मिलिंद नार्वेकरही शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होतील अशी चर्चा होती. परंतु अद्याप मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.  

टॅग्स :मिलिंद नार्वेकरशिवसेनाएकनाथ शिंदे