मुंबई : कुर्ल्यातील मूकबधिर अर्शद अली सादिक अली शेख याची हत्या अटक आरोपी जय चावडा आणि अर्शदची पत्नी रुक्साना हिचा पूर्वनियोजित कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पत्नीचा सहभाग समोर येताच पायधुनी पोलिसांनी बुधवारी रात्री रुक्सानाला अटक केली. तसेच याप्रकरणात परदेशातील व्हिडीओ कॉल आणि अन्य व्यक्तींचा काय संबंध आहे, याबाबतही तपास सुरू आहे.
अर्शदचा २०१२ मध्ये रुक्साना सोबत प्रेमविवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. रुक्सानाही मूक आहे. तो छोटी मोठी कामे करून कुटुंबीयांचा उदर्निवाह करत होता. पायधुनी येथील गुलाल वाडी परिसरात कोट्यवधी किमतीच्या घरात राहणारा जय चावडा आणि शिवजीत सिंग यांच्यासोबत क्रिकेट खेळायला जात असताना मैत्री झाली. जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये ॲनिमेशनचे काम करतो. त्याची आई आणि भाऊ कॅनडामध्ये असतात.
दर रविवारी तिघेही जयच्या घरी एकत्र येत दारू पार्टी करायचे. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले. तर, शिवजीत हा बेरोजगार आहे. जय आणि रुक्सानामध्ये असलेल्या अनैतिक प्रेम संबंधात अर्शद अडसर ठरत असल्याने दोघांनी त्यांच्या हत्येचा कट आखला. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झाल्यानंतर जयने शिवजीतवर सर्व ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला दिलेल्या जबाबात खोटी माहिती देत, शिवजीतचे अर्शदच्या बायकोवरून वाद सुरू असल्याचे सांगितले. त्यातूनच शिवजीतने हत्या करून मला धमकावत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याची खोटी माहिती पोलिसांना देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रुक्सानाचा सहभाग उघडकीस येताच तिलाही अटक करत अधिक तपास सुरू आहे.
काम हो गया है, हा इशारा कुणाला? - जयच्या घरी दारू पार्टी झाल्यानंतर, जयने एका तरुणींसह दोघांना व्हिडीओ कॉल करून, शिवजीतने अर्शदची हत्या केल्याचे दाखवले. शिवजीतने यातील एकाला काम हो गया है, असा इशारा दिला. पुढे त्याच व्यक्तीने हत्येचा लाइव्ह व्हिडिओ मुंबईसह विविध ठिकाणातील मूक बधिरांचा असलेल्या “टीव्ही डिफ व्हिडिओज” या ग्रुपला दाखवला.- ज्या व्यक्तीला काम झाल्याचा इशारा दिला ती व्यक्ती दुबईत असून सर्व सूत्र हलवत असल्याचे नातेवाइकाचे म्हणणे आहे. बेल्जियमच्या मोबाइल क्रमांकावरून ७ मिनिटाचा हा व्हिडिओ कॉल सुरू असल्याचे दिसून येते. ही व्यक्तीचे नेमके कनेक्शन पोलीस शोधत आहेत.