मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत पुणे ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर गॅन्ट्री उभारण्याचे काम गुरुवारी, २५ एप्रिलला करण्यात येणार आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर १९.१०० किमीवर दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हे काम केले जाईल. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत देण्यात आली.
या कालावधीत वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन ५५ किमी येथून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाक्यामार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होऊ शकतील, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.