आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम
By मनोहर कुंभेजकर | Published: January 24, 2023 05:09 PM2023-01-24T17:09:46+5:302023-01-24T17:10:01+5:30
आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
मुंबई: मकर संक्रांत झाल्यावर लगबग सुरू होते ती महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची. गोरेगाव,आरे येथील खडकपाड्यात अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची आखणी केली व वाण म्हणून महिलांना सॅनिटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम राबविला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे यांनी येथील १२५ आदिवासी महिलांना संक्रातीचे वाण म्हणून सॅनेटरी पॅड आणि साखरेचे वाटप केले. अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ही नेहमी आदिवासी बांधवांच्या हिताची कामे करून वेगवेगळे उपक्रम ही संस्था आदिवासी बांधवांसाठी राबवते आणि प्रत्येक सण आनंदाने आदिवासी बांधवांसोबत साजरे करते अशी माहिती त्यांनी दिली.
महिलांना भेडसावत असलेल्या मासिक पाळी संदर्भात आज ही कोणी मनमोकळे पणाने बोलत नाही. अनेक महिलांना मासिक पाळीमुळे उद्भवणाऱ्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यावेळी महिलांशी संवाद साधून महिलांना सॅनिटरी पॅड वापरण्यास सांगितले.सॅनिटरी पॅड वापरल्याने महिलांना जीवन कसे सुखकर होईल व अनेक आजारांपासून आपला बचाव कसा केला जाईल याची सविस्तर माहिती नागरे यांनी दिली.
वनिता मराठे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. यावेळी रेखा कांबळी, बाळा कानडे,शमिका कांबळी, प्रसाद मराठे , ज्ञानेश्वर कांबळे , सुरेखा घुटे, सूरज यादव, अभिषेक नागरे ,यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात सहकार्य केले. हा अनोखा उपक्रम राबवल्या बद्धल यावेळी येथील आदिवासी पाड्यातील वनिता सुतार यांनी सुनीता नागरे यांचे आभार मानले.