मुंबई- आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने, पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे.
अविरत ज्ञानसाधनेच्या जोरावर प्रस्थापितांशी प्रचंड संघर्ष करत 'मूकनायक' ते 'महानायक' असा अत्यंत प्रेरणादायी प्रवास करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या निमित्ताने नागपुरात दीक्षाभूमीवर वेगळाच उत्साह दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर प्रवेश बंद होता. मात्र यंदा निर्बंध मुक्त वातावरणात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात असून मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहेत.