Join us

एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 1:42 PM

पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे.

संजीव साबडे, मुक्त पत्रकार :

मुंबईतील एका गावाच्या नावातच त्याचा अर्थ दडला आहे. तेथील सारी जमीन पाणथळ असलेली. तिथं मिठाची आगारं होती. त्या जमिनीतून मीठ काढलं जायचं. शिवाय अगदी एका टोकाला कोळ्यांची वस्ती. ते घरांना लागून असलेल्या समुद्रात उतरून मासेमारी करायचे. पुढील काही भाग तर लांब आडव्या सुळक्या वा लाकडासारखा. त्यामुळे नावात खारच्या नावात दांडा आला. कुलाब्याची दांडी आणि खारचा दांडा. जवळच आणखी एक गाव होतं. चिंबई नावाचं. आजही आहे ते. तेथील किनारा होड्या नांगरायला बरा होता, पण मासेमारीसाठी बोटी पाण्यात घालताना अडचण यायची. तिथली जमीन फारच भुसभुशीत व सखल होती. त्यामुळे सारे मच्छीमार स्थायिक झाले खार दांडा भागात. 

मच्छीमारांच्या या गावठाणात अनेक पाडे होते. वेताळपाडा, वरीनपाडा, मधलापाडा, पाटील पाडा, कोटपाडा, दंडपाडा या प्रत्येक पाड्याचं स्वतंत्र कुलदैवत. आता त्या गल्ल्या म्हणून ओळखल्या जातात. देशात, राज्यात कधीही होळी असो, खरं दांड्याची होळी दोन दिवस आधी. अगदी आजही ती प्रथा सुरू आहे. खाडीचा पुढील भाग खडकाळ असल्यानं रात्री वा पावसाळ्यात बोटी दगडावर आपटून फुटत. ते प्रकार थांबवण्यासाठी तिथं दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली. त्या उराशी रीफचं आता नाव आहे वाराशी रीफ. खार दांडा आणि चिंबई ही दोन मच्छीमार वस्तीची गावं सोडली की उरलेल्या खार गावात पाठारे प्रभू आणि ईस्ट इंडियन्सची घरं होती.

पाठारे प्रभू राहायचे गिरगावात. पण त्यांनी टुमदार बंगले बांधले वांद्र्याला खेटून असलेल्या खारमध्ये. आजही पाठारे प्रभू आणि काही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी मंडळींची घरं आहेत खारमध्ये. खार गाव तसं मोकळं नी रिकामं होतं. रेल्वे स्टेशनही नव्हतं. मग पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली. त्यामुळे १९२४ साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं.

आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. पूर्वेकडील खारला काही चेहरा नाही. बरीचशी झोपडपट्टी आहे तिथं. पश्चिमेला आतील बाजूस आजही जुने, टुमदार बंगले दिसतात. तिथं मराठी लोक असले तरी आसपास अमराठी मंडळींची, वस्ती वाढली आहे. आतील रस्ते आजही खूप शांत आहेत. तिथं ईस्ट इंडियन्स मंडळींची अनेक घरं आहेत. पण ते मानसिकदृष्ट्या जुन्या वांद्र्यातच वावरतात.खार जिमखाना प्रसिद्ध. लिंकिंगरोडबद्दल काही सांगण्याची गरजच नाही. स्त्रियांचे व लहान मुलांचे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, चपला, आभूषणं यांचा बाजार खूपच लोकप्रिय. तरुणांना आवडतील, अशी हॅपनिंग प्लेसेस, रेस्टॉरंट्स, पब खारमध्ये आहेत. 

टॅग्स :मुंबई