Join us

साडेआठ किलोमीटर लांबीची कोस्टल रोडवर बांधली भिंत ; १० लाख आर्मर व कोअर रॉकचा केला वापर

By सीमा महांगडे | Published: December 16, 2023 5:27 AM

मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाची हमी देणारा सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

सीमा महांगडे

मुंबई : मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाची हमी देणारा सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) हा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साडेदहा किमी लांबीच्या या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या मार्गावर साडेआठ किमी लांबीची भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आठ ते दहा मीटर उंचीची ही भिंत समुद्राच्या लाटांपासून किनारपट्टीचे रक्षण करणार आहे. महाराष्ट्रात नागरी वस्तीत प्रथमच एवढ्या लांबीची भिंत उभारली आहे.

पावसाळ्यात समुद्राला उधाण येते. पाणी अनेकदा किनारपट्टी सोडून आत येते, हे लक्षात घेऊन कोस्टल रोडवर सागरी संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात आली आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाच्या संरक्षणाबरोबरच पुराचा धोका टळणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

काय साहित्य वापरले ?

 संरक्षक भिंतीसाठी आर्मर व कोअर रॉक असे दोन प्रकारचे खडक वापरले. 

 दगडाचे वजन १ ते ३ टन.

 दहा लाख खडकांचा वापर करण्यात आला.

 सी लिंकला हा मार्ग जोडताना प्रियदर्शनी पार्क ते सी लिंकच्या समुद्राच्या दिशेकडील भागापर्यंत भिंत

 १४ लाख ५० हजार ७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) जागा सागरी सुरक्षा भिंत बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती.

नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम करताना फोडण्यात आलेल्या डोंगरात हे दगड निघाले. त्याचा वापर कोस्टल रोडच्या भिंतीच्या कामात करण्यात आला. संरक्षक भिंतीवर जिओ टेक्स्टाईल मटेरियरल वापरण्यात आले आहे.

८२.५१% पूर्ण झालेले काम

९०.७७% प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शनी पार्क

८३.८२% प्रियदर्शनी ते वांद्रे पॅलेस

६९. ४६%  वांद्रे पॅलेस ते सी लिंक

भिंत बांधताना पुराची सर्वोच्च पातळी लक्षात घेतल्याने शहरातील काही भाग तुंबण्यापासून वाचेल. सागरी परिसंस्था धोक्यात येणार नाहीत. गंज, मातीची धूप, भरती-ओहोटीच्या परिणामांची काळजी घेतली जात आहे.