असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 09:49 AM2024-08-16T09:49:21+5:302024-08-16T09:51:50+5:30

आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला. 

a waste free pollution free and dynamic mumbai will be realized this is the new vision of mumbai said bmc commissioner bhushan gagrani | असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँक्रीट रस्ते, बहुस्तरीय रस्ते, आंतरबदल, कोस्टल रोडचा दहिसर व पुढे भाईंदरपर्यंतचा विस्तार, समुद्राचे पाणी स्वच्छ करणारा प्रकल्प, पाणीगळती थांबविण्यासाठी जलबोगदे, २४ तास पाणीपुरवठा... आगामी काळात मुंबईतील या प्रकल्पांमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल दिसून येणार आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वातंत्र्य दिनी मुंबईचे भविष्यातील चित्र साकारले. ‘कचरामुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई आणि गतिमान मुंबई’ हे ध्येय पालिकेने ठेवले आहे.   

आयुक्तांनी गुरुवारी विविध योजनांचा आढावा घेताना त्याची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, योजना कधी पूर्ण होतील, त्यामुळे काय फायदा होईल, याचा लेखाजोखा मांडला. 

समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता वाढणार-

या प्रकल्पांतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडुप व घाटकोपर या ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रांची कामे जुलै २०२२ पासून सुरू आहेत. १,२३३ दशलक्ष लिटर प्रतिदिन इतक्या मलजलावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता चांगली होऊन त्याचा अनुकूल परिणाम सागरी जीवनावर आणि सागरी वनस्पतीवर होऊन पर्यावरण पूरकता साधली जाणार आहे.

नवीन अग्निशमन केंद्रे-

१) उत्तुंग इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी ३० मी. उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन व ५ मिनी वॉटर टेंडर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. 

२) ४० मी. उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन लवकरच दाखल होणार आहे. ठाकूर व्हिलेज, कांदिवली व कांजूरमार्ग येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम होणार आहे. जुहू तारा रोड, सांताक्रुझ, माहूल रोड-चेंबूर व टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

पर्यावरणाचा समतोल साधणार-

१) घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा समतोल राखावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

धूळ नियंत्रणासाठी स्वच्छता मोहीम-

१)  पालिकेने २०२४-२५ चा पहिला वातावरणीय अंदाजपत्रक अहवाल प्रसिद्ध केला. धूळ नियंत्रणासाठी साफसफाईची मोहीम आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी २७ मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. 

२)  वायुप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये सुधारणा झाली आहे.

पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ-

१) पूर्व उपनगरांमध्ये जलवाहिन्यांमार्फत पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी तीन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी अमर महल (चेंबूर) ते वडाळा आणि पुढे परळपर्यंत जलबोगद्याचे खोदकाम जून २०२४ ला पूर्ण झाले. 

२) जलबोगद्याचे  अस्तरीकरण  व उर्वरित कामे एप्रिल-२०२६ पर्यंत पूर्ण होतील. अमर महल (चेंबूर) ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जलबोगद्याच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे सप्टेंबर-२०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पवई ते घाटकोपर जलाशयादरम्यान जलबोगद्याचे कामदेखील प्रगतिपथावर आहे.

३२५ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण-

१)  मुंबईत ३२५ कि.मी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी ४ निविदांची कामे प्रगतिपथावर आहेत. 

२) दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. काँक्रिटीकरणामुळे वाहतूक सुरळीत व खड्डेमुक्त होऊन वेळ व वाहनांच्या इंधनात बचत होईल, असा विश्वास आहे.

शुद्ध पाणी २४ तास अखंडितपणे-

१) मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या  ५५ टक्के पाणीपुरवठा पिसे पांजरापूर संकुलातून केला जातो. 

२) शुद्ध पाणी २४ तास अखंडितपणे मिळण्यास मदत होण्यासाठी स्थिरावणी टाकी क्र. २ येथे सीपीव्हीसी लॅमेला प्लेटस् बसविण्यात आल्या असून, यामुळे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा झाली आहे. मलबार टेकडी उतारावरील निसर्ग उन्नत मार्गाचे (ट्री वॉक) ७० टक्के काम पूर्ण  झाले असून, संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.   

Web Title: a waste free pollution free and dynamic mumbai will be realized this is the new vision of mumbai said bmc commissioner bhushan gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.