महारेरा संकेतस्थळाच्या वापरात तब्बल 7 पटीने वाढ; घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम

By सचिन लुंगसे | Published: February 12, 2024 02:09 PM2024-02-12T14:09:28+5:302024-02-12T14:10:12+5:30

संकेतस्थळातील बदलानंतर गेल्या ऑगस्ट पासून भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल 40 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे.

A whopping 7-fold increase in Maharera website usage; Home buyers increasingly empowered | महारेरा संकेतस्थळाच्या वापरात तब्बल 7 पटीने वाढ; घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम

महारेरा संकेतस्थळाच्या वापरात तब्बल 7 पटीने वाढ; घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम

मुंबई : महारेराच्या संकेतस्थळात घर खरेदीदार, प्रवर्तक आणि एजंटस अशा सर्व संबंधित घटकांना मदतीचे, मार्गदर्शक ठरू शकणारे बदल करण्यात आल्याने गेल्या 6 महिन्यांपासून या सर्व घटकांकडून महारेराच्या संकेतस्थळाच्या वापरात पूर्वीच्या तुलनेत तब्बल 7 पटीने वाढ झाली आहे. मे 2017 ला महारेरा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 39 हजार 561 जणांनी महारेराच्या संकेतस्थळाला भेट दिली. संकेतस्थळातील बदलानंतर गेल्या ऑगस्ट पासून भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल 40 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे. जी एकूण संख्येच्या एक तृतीयांश  अशी लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या दिवसाला तब्बल 33,713 आणि तासाला 1400 जण महारेराच्या संकेतस्थळाचा वापर करीत आहेत. 6 महिन्यांपूर्वी हेच प्रमाण दिवसाला 5196 आणि तासाला 216 असे होते.

संकेतस्थळावरील अपेक्षित, उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीच्या सहज उपलब्धतेमुळे घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम होत आहेत.  महारेराच्या संकेतस्थळाची वाढती उपयुक्तता लक्षात घेता ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. महारेराने ऑगस्ट महिन्यात आपल्या संकेतस्थळात आणखी अनेक ग्राहककेंद्रीत बाबी सुरू केल्या. यात केवळ तक्रारी नोंदविण्याबाबत नाही तर गृहनिर्माण प्रकल्पांची सर्व प्रकारची मूलभूत माहिती, ज्यात सर्व मंजुऱ्या, बांधकामाचा आराखडा, आरेखने , सोयी सुविधा  , प्रकल्पाची सद्यस्थिती  अशी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. शिवाय घरखरेदीदार आणि प्रकल्पांचे प्रवर्तक  अशा दोघांनाही मार्गदर्शक ठरतील अशाही अनेक बाबी या संकेतस्थळावर आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटस यांनाही या संकेतस्थळाची यथोचित मदत होत आहे.

 

स्थावर संपदा क्षेत्रातील सर्व बाबींबाबत जास्तीत जास्त पारदर्शकता वाढावी , या क्षेत्रात विश्वासार्हता  निर्माण व्हावी, ग्राहकाला आपली गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित आहे असा विश्वास वाटावा ,या दृष्टीनेच महारेराचे सर्व प्रयत्न आहेत. त्यासाठी आपले संकेतस्थळ अधिकाधिक उपयुक्त आणि अपेक्षित माहितीने परिपूर्ण असावे, यासाठी महारेरा कटिबद्ध आहे.

आजचे युग हे माहितीचे युग आहे. कुठल्याही यंत्रणेचे संकेतस्थळ हे अद्ययावत , अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीचे सर्वांना सहजपणे उपलब्ध असणारे व्यासपीठ असावे, अशी अपेक्षा असते. महारेराचे संकेतस्थळ सध्याही ही अपेक्षा पूर्ण करीत असले तरी विविध महत्वाची माहिती आणि काळानुरूप सुसंगत बदल, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून महारेरा आपल्या संकेतस्थळात आणखी ग्राहककेंद्रीत बदल करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

Read in English

Web Title: A whopping 7-fold increase in Maharera website usage; Home buyers increasingly empowered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.