एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 06:53 AM2024-07-10T06:53:25+5:302024-07-10T06:55:02+5:30
महिलेचे लगेज विमानात चढवण्यास कंपनी विसरल्यामुळे सोशल मीडियावर दाद मागण्याची वेळ तिच्यावर आली.
मुंबई:एअर इंडिया कंपनीच्या बेजबाबदारपणाचे किस्से नवे नाहीत. कंपनीच्या ढिसाळपणाचे अनुभव अनेकदा अनेक प्रवाशांनी घेतले आहेत. पण, हा प्रकार घडला तो अमेरिकेहून भारतात म्हणजे बंगळुरूत आलेल्या एका महिला संशोधक महिलेच्या बाबतीत. या महिलेचे लगेज विमानात चढवण्यास कंपनी विसरल्यामुळे सोशल मीडियावर दाद मागण्याची वेळ तिच्यावर आली.
घडले असे: अमेरिकेतील पूजा कथाली भारतात आल्यानंतर त्यांचे लगेज त्यांना मिळाले नाही. त्यांनी एअर इंडियाच्या कॉल सेंटरशी फक्त (१) ४० वेळा संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर व्यथा मांडली.
...आणि कंपनी जागी झाली
पूजा कथाली अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. भारतात विवाह सोहळ्यासाठी त्या आल्या, पण त्यांचे लगेज आलेच नाही. त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि अनेकांनी अनुभव कथन करून कंपनीचा कारभाराचे वाभाडे काढले.
"एअर इंडियाच्या बेजबाबदारपणामुळे माझ्याकडे परिधान करण्यासाठी कपडे नाहीत", या तिच्या पोस्टनंतर एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त करीत त्यांच्या लेगजचा शोध सुरू केला. ते सापडले की नाही ते माहीत नाही पण, कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कसा मनःस्ताप होतो, त्याचे हे उदाहरण.